मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार आणि लष्कर ए तय्यबाचा प्रमुख हाफिज सईद याने भारत-पाकिस्तान सीमेवर दिसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
नवी दिल्ली- मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार आणि लष्कर ए तय्यबाचा प्रमुख हाफिज सईद याने भारत-पाकिस्तान सीमेवर दिसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हाफिज सईदने सांबा प्रांतातील पाकिस्तानी चौक्यांना शनिवारी रात्री भेट दिल्याचे भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या निदर्शनास आले आहे. यामुळे काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाला दिल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय सीमेपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या पाकिस्तानच्या सुखमल चौकीजवळ सहा ते सात गाड्यांमधून आलेल्या २५ ते ३० जणांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता भेट दिली. तेथे चौकीत त्यांची अर्धा तास बैठक झाली. त्यानंतर जात असताना त्यांनी ‘हाफिज सईद झिंदाबाद’ अशा घोषणा दिल्या. अंधूक अंधार आणि जंगलातील झाडांमुळे तेथे नेमके कोणकोण होते ते सांगू शकत नाही, मात्र त्यांच्या सईद झिंदाबादच्या घोषणा आमच्या सीमेवर गस्तीसाठी सज्ज असलेल्या जवानांनी स्पष्ट ऐकल्या, असे बीएसएफचे महासंचालक डी. के. पाठक यांनी सांगितले.
पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. गेल्या आठवडाभरापासून या दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी म्हणून या परिसरात गोळीबाराचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेच्या कारणास्तव या परिसरातील ११ गावातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर केल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रजासत्ताक दिन जवळ आल्याने आणि विशेष म्हणजे यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे प्रमूख पाहुणे येणार असल्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी करुन अनेक ठिकाणी स्फोट घडवून दहशतवाद निर्माण करण्याचा कट आखला आहे. यासाठी जीपीएस सिस्टीम्स, सॅटेलाइट फोन्स, सखोल नकाशे आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांसह सज्ज असलेले सुमारे ४०० दहशतवादी सीमाभागातून गटागटाने भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची खळबळजनक माहिती मिळाली आहे.
सूत्रांकडून माहितीनुसार, या दहशतवाद्यांना मीरपुर आणि कोटली येथील शिबीरांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच हाफिज सईद आणि आयएसआय यांच्यात गेल्या महिनाभरात सहावेळा गुप्त बैठक झाल्या. यानंतर लष्कराचे तीन कमांडर हाफिज सईदच्या सुरक्षेसाठी देण्यात आले आहेत. तसेच आयएसआयचे प्रमूख रिजवान अख्तर यांचा विश्वासू कमांडर असद सैफुल्लाह यालाही हाफिज सईद सोबत या मोहिमेवर पाठवर आहे. तर हाफिज सईदचा जुना साथीदार सलेम इस्लामयाला सियालकोट भागात तैनात केले असून तेथील सांबा आणि हीरानगर विभागातून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची जबाबदारी सोपवली आहे. सध्या कोटली येथे १०, मनसेरा येथे पाच, मनकोट येथे १० शिबीर कार्यरत असून तेथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
२०१४ मध्ये पाकिस्तानी सैन्याकडून ५६२ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. २००३ पासून शस्त्रसंधीचे उल्लंघन दरवर्षी वाढत असून ते यावर्षी सर्वाधिक वाढले आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा वाढता धोका लक्षात घेऊन काश्मीरमध्ये लष्कराने अतिरिक्त कुमक तैनात केली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नियंत्रण रेषेवर करडी नजर ठेवण्याच्या आणि गरज असल्यास सडेतोड प्रतिउत्तर देण्याच्या सूचना सीमा सुरक्षा दलाला दिल्या आहेत.
यापूर्वी जुलै २०१४ मध्येही हाफिज सईदने भारत-पाकिस्तान सीमेवरील गावांचा दौरा केला होता. हाफिज सईदने राजस्थानमधील जैसलमेर सीमेवरील इस्लामकोट, मीरपूर खास, मिठी, खेरपूर परिसराचा दौरा केला होता.