चंदीगड महापालिकेने हुतात्मा दिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमध्ये भारतीय सैनिकांऐवजी चक्क अमेरिकन सैनिकांचे छायाचित्र छापल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
चंदीगड- चंदीगड महापालिकेने हुतात्मा दिवसानिमित्त लावलेल्या बॅनरमध्ये भारतीय सैनिकांऐवजी चक्क अमेरिकन सैनिकांचे छायाचित्र छापल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.
शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची पुण्यतिथी हा हुतात्मा दिवस साजरा केला जातो. चंदीगड महापालिकेने यासाठी शहरात ठिकठिकाणी बॅनर लावले होते.
या बॅनरमध्ये भारतीय लष्कराचे जवान दाखवण्याऐवजी अमेरिकन जवानांचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. या जवानांच्या गणवेशावर असलेला अमेरिकेचा राष्ट्रध्वजही छायाचित्रात स्पष्ट दिसत आहे.
हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर चंदीगडच्या महापौर पूनम शर्मा यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र तो होऊ शकला नाही. तर उपमहापौर गुरबक्स रावत यांनी हा प्रकार घडल्याचे आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले.