आयपीएलमध्ये सोमवारी (११ मे) सनरायझर्स हैदराबाद घरच्या मैदानावर किंग्ज इलेवन पंजाबशी दोन हात करतील.
हैदराबाद- आयपीएलमध्ये सोमवारी (११ मे) सनरायझर्स हैदराबाद घरच्या मैदानावर किंग्ज इलेवन पंजाबशी दोन हात करतील. सलग दुस-या विजयासह गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचलेल्या यजमानांना तळाला असलेल्या पंजाबविरुद्ध विजयाची सर्वाधिक संधी आहे.
शनिवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सवर विजय मिळवत हैदराबादने आठव्या हंगामात बाद फेरी गाठण्यासाठी आव्हान कायम ठेवले. अद्याप तीन लढती शिल्लक असल्या तरी यंदा प्रचंड चुरस आहे. त्यामुळे हैदराबादला सातत्य राखताना उर्वरित लढतींमध्ये अधिकाधिक विजय मिळवावे लागतील. घरच्या पाठीराख्यांसमोर तसेच तुलनेत प्रतिस्पर्धी कमकुवत असल्याने यजमानांना गुणतालिकेत आणखी वरचे स्थान मिळवण्याला वाव आहे.
कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन या सलामी दुकलीवर त्यांची फलंदाजीची भिस्त राहीली आहे. मात्र दिल्लीविरुद्ध दोघांना मोठी खेळी करण्यात अपयश आले तरी मॉईझेस हेन्रीकेसने फटकेबाज अर्धशतकी खेळी करताना संघाला चांगली धावसंख्या रचण्यात मोलाचे योगदान दिले. त्याने अष्टपैलू योगदान देताना प्रभावी गोलंदाजीही केली. हेन्रीकेसला मध्यमगती भुवनेश्वर कुमारसह परवेझ रसूल आणि करन शर्मा या फिरकी दुकलीची चांगली साथ लाभली. उंचावलेली सांघिक कामगिरी पाहता हैदराबादचे पारडे जड वाटत असले तरी त्यांना प्रतिस्पध्र्याना कमी लेखू नये.
पंजाबला ११ लढतींमध्ये केवळ २ विजय मिळवता आलेत. त्यांचे आव्हान संपल्यात जमा आहे. मात्र जॉर्ज बेली आणि सहका-यांनी शेवटच्या लढतीत फलंदाजी उंचावताना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्ससमोर चांगले आव्हान उभे केले होते. मात्र आंद्रे रसेलने विजयाचा घास हिरावून घेतला. सलामीवीर मुरली विजयने ब-यापैकी सातत्य राखले तरी अन्य फलंदाज अद्याप फॉर्मच्या शोधात आहेत.
ग्लेन मॅक्सवेलला कोलकात्याविरुद्ध सूर गवसला तरी मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले. अनुभवी वीरेंदर सेहवागला पंजाबने परवा संघाबाहेर बसवले. त्याच्या अनुपस्थितीतही फलंदाजी बहरल्याने हैदराबादविरुद्धही सेहवागला विश्रांती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. अनुरीत सिंग आणि संदीप शर्मा या मध्यमगती दुकलीसह फिरकीपटू अक्षर पटेलने सातत्य राखले तरी त्यांचा अनुभव कमी पडतो. बाद फेरीचे आव्हान संपुष्टात आल्याने पंजाबची उर्वरित तीन लढतींमधील कामगिरी फारशी महत्त्वाची नाही. प्रतिस्पर्धी संघाचे गणित बिघडवण्याचे काम ते करू शकतात.
वेळ : रा. ८ वा.