१९ वर्षीय लक्षय याने पुरुषांच्या ट्रॅप प्रकारामध्ये रौप्य पदकाची कमाई केली. त्याने अंतिम फेरीत ४५पैकी ३९ शॉट अचूक मारताना दुसरा क्रमांक मिळवला. भारताच्या आशा अनुभवी मानवजीत सिंग संधू याच्यावर होत्या. मात्र त्याचे आव्हान पात्रता फेरीत संपले. ३०पैकी २६ शॉट अचूक मारणारा मानवजीत चौथ्या स्थानी राहिला.
चायनीज तैपेइच्या कुन्पी यान्ग याने ट्रॅप प्रकारात ४८ अचूक शॉट लगावताना आशियाई विक्रमाशी बरोबरी केली. तसेच सुवर्णपदक पटकावले. कोरियाच्या डेइमीयॉन्ग याने (३० शॉट) कांस्यपदक मिळवले.
सेपक टकरावमध्ये ऐतिहासिक पदकाची संधी
सेपक टकराव क्रीडा प्रकारामध्ये भारताला ऐतिहासिक पदक मिळवण्याची संधी आहे. पुरुषांच्या सांघिक रेगू प्रकारात इराणवर २१-१६, १९-२१, २१-१७ अशी मात करताना भारताने उपांत्य फेरी गाठली.
पुरुष कबड्डी : भारत द. कोरियाकडून पराभूत
गतविजेता आणि जगज्जेता भारताच्या पुरुष संघाला गटवार साखळीतील तिस-या लढतीमध्ये सोमवारी दक्षिण कोरियाकडून २३-२४ असा निसटता पराभव पाहावा लागला. आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील हा भारताचा पहिलाच पराभव आहे. पहिल्या दिवशी भारताने श्रीलंका आणि बांगलादेशवर विजय मिळवला आहे.
व्हॉलीबॉल : पुरुष संघाची विजयी सलामी
व्हॉलीबॉल पुरुष गटामध्ये हाँगकाँगला ३-०(२७-२५, २५-२२, २५-१९) असे हरवत विजयी सलामी दिली.