दिल्ली-फैजाबाद एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला असून या अपघातात १०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
नवी दिल्ली- दिल्ली-फैजाबाद एक्सप्रेसचे आठ डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला असून या अपघातात १०० हून अधिक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. हा अपघात रविवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उत्तप्रदेशमधील गरमुक्तेश्वर आणि कंकाठेर रेल्वे स्थानकादरम्यान झाला.
एक्स्प्रेसचे डबे रुळावरून घसरून पुढे जाऊन पलटी झाल्याची माहिती मिळते. यामध्ये दोन स्लीपर, चार एसी आणि एसएलआरचे काही डबे होते. कपलिंग तुटल्यामुळे रेल्वेचे डबे रुळावरून घसरून अपघात झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू करण्यात आले. ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाशी एक्स्प्रेसच्या खिडक्यांमधून बाहेर निघाले.
जखमी झालेल्या प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही प्रवाशांना खाजगी वाहनांच्या साह्याने सुरक्षित ठिकाणी पाठविण्यात आले. या अपघातामुळे पदमावत एक्स्प्रेस, नौचंदी एक्स्प्रेस, सीतापुर-दिल्ली एक्स्प्रेस आणि दोन पैसेंजर गाड्याच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला.
मोठी दुर्घटना टळली
दिल्ली फैझाबाद एक्सप्रेस ज्या मार्गे जात होती तेथे पुढेच गंगानदी आहे. जर हा अपघात या नदीजवळ झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.