शिवसेनाप्रमुखांची गर्जना ऐकण्यासाठी राज्यातील कानाकोप-यातून येणा-या लाखो शिवसैनिकांनी शिवर्तीर्थावर रविवारी आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप दिला.
मुंबई- मराठी मनाचे मानबिंदू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने रविवारी शिवतीर्थावर लक्षावधी शिवसैनिक आणि चाहत्यांच्या उपस्थितीत साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला. एका अर्थी मुंबईत जणू दोन सूर्यास्त झाले! शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पार्थिवाला मंत्राग्नी दिला. त्यावेळी, उपस्थितांना शोकावेग अनावर झाला. राज ठाकरे यांच्यासह जयदेव, आदित्य, रश्मी, शर्मिला, स्मिता आदी ठाकरे परिवार शोकमग्न होऊन गेला. ‘एकच नेता, एकच विचार, एकच मैदान’ असे म्हणत जेथून गेली साडेचार दशके मराठी माणसांवर राज्य केले, त्याच शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या पार्थिवावर रविवारी सहा वाजून १५ मिनिटांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तब्बल ९२ वर्षापूर्वी म्हणजे एक ऑगस्ट १९२० रोजी लोकमान्य टिळकांच्या अंत्ययात्रेला जशी अफाट गर्दी झाली होती, तशीच लक्षावधी मराठी माणसे शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी रविवारी शिवतीर्थावर जमा झाली होती. बाळासाहेबांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानापासून सुरू झालेला जनांचा प्रवाह सागराचे विराट रूप धारण करत शिवतीर्थावर जेव्हा पोहोचला, तेव्हा शेजारच्या अरबी समुद्रालाही जणू ओहोटी लागलेली दिसली. जनसागराच्या लक्ष लक्ष मुखातून उमटणाऱ्या गगनभेदी घोषणा ‘परत या, परत या.. बाळासाहेब परत या’, अशी आर्जवे करत असताना अरबी समुद्राच्या लाटाही जणू स्तब्ध झाल्या होत्या. आपल्या कर्तृत्वाने अर्ध शतकाहून अधिक काळ तेजाने तळपणारे बाळासाहेब पंचत्वात विलीन होताना आकाशही दु:खाने काळवंडून गेले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात सूर्यास्त झाला.
बाळासाहेब ठाकरे यांचे निधन शनिवारी दुपारी तीन वाजून ३३ मिनिटांनी झाले. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि त्यांच्या चाहत्यांनी ‘मातोश्री’ आणि शिवतीर्थाकडे धाव घेतली. सकाळी साडेनऊ वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली. तर संध्याकाळी सहा वाजून १५ मिनिटांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाला त्यांचे पुत्र उद्धव यांनी मंत्राग्नी दिला.
या वेळी राज आणि जयदेव ठाकरे यांच्यासह शिवसेनाप्रमुखांची सेवा करणारे चंपासिंग थापा आणि त्यांचे स्वीय सहाय्यक रवींद्र म्हात्रे यांच्यासह, बाळासाहेबांवर आयसीयूमध्ये वैद्यकीय उपचार करणा-या पथकातील डॉक्टर, वॉर्डबॉयही उपस्थित होते. राजकारण, कला, क्रीडा, उद्योग आदी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनीही शिवसेनाप्रमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.
अश्रू आणि फुले
बाळासाहेबांना पिवळा चाफा खूप प्रिय होता. प्रत्येक जाहीर सभेत त्यांना चाफ्याचा पुष्पहार घालण्याची प्रथा होती. ही प्रथा त्यांना अखेरचा निरोप देतानाही शिवसैनिकांनी पाळली. सेनाप्रमुखांचे पार्थिव शिवतीर्थावर अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर पिवळ्या चाफ्याची फुले वाहण्यात आली होती.
जनसागरात सूर्य मावळला »
[EPSB]
साहेब, तुम्ही हवे होता! »
मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाची बातमी दूरचित्रवाणीवर पाहिली आणि मन हेलावून गेले. त्यांच्या आठवणीने डोळ्यांतून अश्रू वाहू ला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन »
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्याची माहिती लीलावती रुग्णालयाचे डॉ. जलिल परकार यांनी शुक्रवारी दिली.…
वाघासारखी झेप घेणारा नेता हरपला »
‘धाडसाने निर्णय घेण्याची ताकद जितकी बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होती तितकी अन्य कोणत्याही नेत्यामध्ये नाही. संकटात वाघासारखी झेप घेण्याचे धाडस…
आठवणीतले बाळासाहेब… (फोटो फिचर) »
एक व्यंगचित्रकारापासून सुरु झालेला बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जीवनप्रवासात अनेक लोकं भेटली आणि त्यांच्याशी एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं.…
[/EPSB]
वाघाचे बछडे आहोत ….
शेळपटाची अवलाद नाही
लढायला शिकवून गेलाय बाप
रडायचं काम नाही
साहेब गेले आणि महाराष्ट्र पोरका झाला.
भावपूर्ण श्रद्धांजली साहेब तुमचे आशीर्वाद आम्हा मराठी माणसावर राहतील.
घरातला माणूस गेला…