भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोमनाथ मंदिराकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही तरुणांनी अंडी फेकली.
अहमदाबाद- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा सोमनाथ मंदिराकडे जात असताना त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही तरुणांनी अंडी फेकली. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पाटीदार समाजातील तरुणांनी अमित शहा यांच्या ताफ्याला लक्ष्य केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. सोमवारी रात्री उशिरा हा प्रकार घडला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौ-यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महामार्गावरून सोमनाथ मंदिराकडे जात होते, त्यावेळी काही तरुणांनी त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अंडी फेकली. या आंदोलनाचे वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’च्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे.
भाजपाच्या नेत्यांना अशा स्वरूपाच्या निषेधाच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. काही दिवसांपूर्वीच गुजरातचे मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांच्यावर एका तरुणाने विधानसभेबाहेरच बूट फेकला होता.
भाजपाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष ऋत्विज पटेल यांच्या मेहसाना येथील रॅलीत एका युवकाने कानशिलात लगावली होती. तर सूरतमधील त्यांच्याच एका रॅलीत अंडी फेकली होती.
मोदी यांचा दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौ-यावर येणार आहेत. ते बुधवारी सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच सोमनाथ मंदिरात येत आहेत. या दौ-यातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडक बंदोबस्त ठेवला आहे. त्यामुळे ८ मार्चपर्यंत सर्व पोलिसांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व हार्दिक पटेल करत आहे. गुजरातमध्ये १९८८ पासून भाजपाचे सरकार आहे. पाटीदार आंदोलनाने या सरकारवर दबाव निर्माण झाला आहे.
त्यामुळे ‘बॅकफूट’वर गेलेल्या भाजपाला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत आहेत. पाटीदार आंदोलनानंतर त्यांनी अनेकदा गुजरातचा दौरा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्यापासून सुरू होणारा दौराही त्यासाठीच असल्याचे मानले जात आहे.