काँग्रेसच्या देशव्यापी उपोषणाचा फज्जा उडाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भाजपकडून करण्यात आलेल्या उपोषणात भाजपच्या पुण्यातील दोन आमदारांनी सँडविच आणि मिठाई खाल्ल्याचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.
पुणे- काँग्रेसच्या देशव्यापी उपोषणाचा फज्जा उडाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी भाजपकडून करण्यात आलेल्या उपोषणात भाजपच्या पुण्यातील बाळा भेगडे व भीमराव तापकीर या दोन आमदारांनी सँडविच आणि मिठाईवर उभा-आडवा हात मारल्याचे फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले आहेत.
काँग्रेसमुळेच अधिवेशनाचा अमूल्य वेळ वाया गेला, असा भाजपचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी देशभरातील भाजपाच्या खासदार आणि आमदारांकडून लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरासमोर उपोषणासाठी भाजपाचे नेते जमले होते. यामध्ये बाळा भेगडे व भीमराव तापकीर यांचाही समावेश होता. सुरूवातीचा काहीवेळ उपोषणस्थळी हजेरी लावल्यानंतर हे दोघेही जलयुक्त शिवार व खरीप नियोजनाच्या सरकारी बैठकीसाठी गेले. त्याठिकाणी बैठकीच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे खाण्यासाठी सँडविच, वेफर्स आणि मिठाई टेबलावर ठेवण्यात आली. तेव्हा मात्र बाळा भेगडे आणि भीमराव तपकीर यांना उपोषणाचा विसर पडला आणि त्यांनी सँडविच, वेफर्स व मिठाईवर ताव मारला. काहीवेळातच याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
त्यानंतर याबद्दल विचारले असता या दोन्ही आमदारांनी आम्ही सकाळपासून उपाशी असल्याचे कारण सांगितले. मात्र, या प्रकारामुळे पुणे भाजपवर चांगलीच नामुष्कीची वेळ ओढावली आहे.
यापूर्वी मोदी सरकारला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसकडून एक दिवसाचे उपोषण करण्यात आले होते. मात्र या उपोषणाआधी काँग्रेस नेते छोले भटुरे खात असल्याची छायाचित्रे समोर आली आणि भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेससारखी नामुष्की आपल्यावर ओढवू नये, यासाठी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सर्व खासदार, आमदार आणि कार्यकर्त्यांना विशेष सूचना करण्यात आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी खाणे टाळा. उपोषणाला येण्याआधी काही खात असाल, तर त्यावेळी फोटो काढू नका, अशा सूचना भाजपच्या नेत्यांना देण्यात आल्या होत्या.
काँग्रेसवर आलेला प्रसंग आपल्यावर येऊ नये यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी अथवा नंतर सार्वजनिक ठिकाणी खाण्याचे टाळण्यास सांगण्यात आले होते. परंतु पुण्यातील आमदारांना त्या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसून आले.