काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही बुलेट ट्रेन नोटाबंदीसारखीच आहे. मार्गात येणा-या लोकांना ती चिरडून पुढे जाईल, असे ते म्हणाले. बुलेट ट्रेनसाठी पैसे खर्च करण्यापेक्षा तेच रेल्वे सुरक्षेवर करा, असा सल्लाही त्यांनी दिला. मुंबईतील एलफिन्स्टन रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीत आतापर्यंत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
रेल्वेने बुलेट ट्रेनसारख्या महागडय़ा प्रकल्पावर काम करण्यापेक्षा प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करून पायाभूत सुविधा देण्यावर भर द्यायला हवा. रेल्वे सुरक्षा, पायाभूत सोई-सुविधांवर खर्च करायला हवा, असे चिदंबरम म्हणाले. बुलेट ट्रेन सामान्यांसाठी नाही. तर ती उच्च वर्गातील लोकांची अहंकारी यात्रा असेल, असा हल्लाही त्यांनी चढवला. याआधी भाजपचा सहकारी पक्ष शिवसेनेनेही केंद्र सरकारच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून रेल्वेच्या सुरक्षेवर भर द्यायला हवा, असे म्हटले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही बुलेट ट्रेन प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे.
[EPSB]
तर मुंबईत बुलेट ट्रेन होऊ देणार नाही- राज ठाकरे
मुंबईतील उपनगरीय रेल्वेचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही, अशी ठाम भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे.
[/EPSB]