एखाद्या कार्यक्रमासाठी साडी घेतली तर त्यावर मॅचिंग म्हणून कानातले, हार, बांगडय़ा असे आर्टिफिशिअल दागिने महिला खरेदी करतात. मात्र आजकाल अस्सल सोनंही विविध रंगांत उपलब्ध होऊ लागलंय.
आर्टिफिशिअल दागिन्यांची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आपल्या ड्रेसवर मॅच होईल असे दागिने घ्यायला कोणाला आवडत नाहीत? जीन्स, टॉप, वन-पीसवर अगदी नाजूक हिरे जडय़ांचे दागिने शोभून दिसतात. आर्टिफिशिअलसोबतच नाजूक नक्षीकामाचं सोनंही उपलब्ध होऊ लागलं आहे. एवढंच नव्हे तर आजकाल कलरफुल सोनंही बाजारात दिसू लागले आहे.
रंगीत सोन्याचे दागिने आल्याने आर्टिफिशिअल दागिन्यांना थोडय़ाफार प्रमाणात चपराक बसली आहे, कारण सोन्याचे दागिने वापरणे कोणाला आवडणार नाही? शिवाय आपल्या कपडय़ांच्या रंगानुसार हे रंगीत दागिने वापरणे प्रत्येकीलाच आवडेल की नाही! त्यामुळे एखाद्या कार्यक्रमाला जाताना असं कलरफुल होऊन गेल्यावर त्या कार्यक्रमाला चारचाँद लागणारच ना!
या रंगीत सोन्याच्या दागिन्यांमध्ये जवळपास ९२ टक्के सोनं वापरलं जातं तर रंगासाठी अलॉय वापरलं जातं. अलॉय म्हणजे इतर धातूंचं मिश्रण. सोन्याला हार्डनेस देण्यासाठी अलॉय वापरलं जातं. गुलाबी, राखाडी, निळा, जांभळा अशा विविध रंगांत आढळणा-या सोन्यामध्ये गुलाबी, पिच ग्रोव्ह तयार करण्यासाठी अलॉय वापरलं जातं.
निळ्या रंगासाठी चांदी किंवा तांबं हे धातू वापरले जातात. रंगीत सोन्यासाठी १८ कॅरेटचा वापर करतात. रंगीत सोन्याचा शोध परदेशात लागल्याने भारतात रंगीत सोन्याची खरेदी-विक्री फार कमी व्हायची. त्यामुळे एखाद्याच्या ऑर्डरनुसारच मोठे विक्रेते परदेशातून हे सोनं मागवत असत. मात्र आता मुंबईतही हे रंगीत सोने उपलब्ध झाले आहे.
मुंबईत हे दागिने उपलब्ध झाल्याने भारतातही रंगीत सोन्याची मागणी वाढली आहे. पिवळ्या धम्मक सोन्याचं रूपांतर आतात विविध रंगांत झाल्याने महिलांनी पसंती दर्शवली आहे. त्याचसोबत नाजूक-नक्षीदार रंगीत सोन्यामुळे तरुणींमध्येही या दागिन्यांचा ट्रेंड वाढताना दिसत आहे.