एटीएम आणि डेबिट कार्ड वापरावर एक जानेवारीपासून पुन्हा शुल्क आकारणी सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या सुरूवातीला एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, एटीएम आणि डेबिट कार्ड वापरावर एक जानेवारीपासून पुन्हा शुल्क आकारणी सुरू करण्यात आल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
नोटाबंदीचा अचानक निर्णय घेतल्याने नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी सरकारने बँकांना एटीएम आणि डेबिट कार्डवरील शुल्क आकारणी ३१ डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.
बँकांना देण्यात आलेली मुदत ३१ डिसेंबरला संपली. सरकारकडून कोणतीही नवीन सुचना मिळाली नसल्याने बँकांनी कार्डच्या व्यवहारांवर शुल्क आकारण्यास सुरूवात केली आहे.
अचानक घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अद्यापही परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे एटीएम आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून केल्या जाणा-या व्यवहारांवर आकारले जाणारे शुल्क ३१ डिसेंबरनंतरदेखील आकारण्यात येणार नाही, अशी अपेक्षा होती.