लोकप्रिय अशा सोशल नेटवर्कींग साईट फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर आता कायद्याचे नियंत्रण येणार आहे.
नवी दिल्ली- लोकप्रिय अशा सोशल नेटवर्कींग साईट फेसबूक आणि व्हॉट्सअॅपवर आता कायद्याचे नियंत्रण येणार आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने याबाबत माहिती दिली आहे.
देशभरातल्या टेलिकॉम कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्राय ही संस्था आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्कींग कंपन्या टेलिकॉम कंपनीचा वापर करतात. मॅसेज आणि फोनची सुविधा देऊन प्रतिस्पर्धी निर्माण करतात. असे असूनही या सेवांसाठी कुठलेही नियंत्रण आणि नियम नाहीत. यामुळे लवकरच या सेवांवर नियंत्रण आणणार असल्याचे दूरसंचार विभागाने सांगितले.
सोशल मीडिया सेवा देणा-या कंपन्यांच्या व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा असावी अशी सरकारची भूमिका आहे. फेसबुक, व्हॉट्स ऍप, स्काईप, जी-टॉकसारख्या सेवांचा यामध्ये समावेश आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून होणा-या संवादावर आणि त्याच्या डेटाचा उपयोग या कंपन्या व्यावसायिक वापरासाठी करत होत्या. त्यावर निर्बंध घालण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्याच याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सरकारचे मत विचारले होते. या कंपन्यांच्या सेवांवर नियंत्रण ठेवण्याचे संकेत सरकारने न्यायालयाला दिले आहेत. याबाबतची पुढील सुनावणी १८ एप्रिलला होणार आहे.