पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील यांनी वयाच्या ५८व्या वर्षी ५८ किमी अंतर धावून पोलीस दलातील तरुण सहका-यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
अलिबाग- पेण तालुक्यातील दादर सागरी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले रायगड जिल्हा पोलीस दलाचे माजी क्रीडाप्रमूख विश्वनाथ पाटील यांनी गुरुवारी वयाच्या ५८व्या वर्षी ५८ किमी अंतर धावून ३९ वर्षांच्या पोलीस दलातील प्रदीर्घ सेवेची आगळ्यावेगळ्या पद्धतीने सांगता केली. निवृत्ती दिनी ५८ किमी धुवून त्यांनी पोलीस दलातील तरुण सहका-यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे.
विश्वनाथ पाटील यांनी २००६ मध्ये सलग ३ हजार २५३ सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम प्रस्थापित केला. तर २००८ मध्ये सलग ६ हजार २०० जोर (बैठका) मारून विक्रम प्रस्थापित केला. पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ पाटील गुरुवारी वयाच्या ५८ व्या वर्षी ३९ वर्षांच्या पोलीस दलाच्या सेवेतून गुरुवारी ( दि.३०) सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीच्यादिवशी ५८ किमी धावण्याचा त्यांनी संकल्प केला होता. तो आज त्यांनी पूर्ण केला.
पावसाची संततधार… रस्त्यात पडलेले खड्डे… वाहनांची वर्दळ… अशा प्रतिकूल वातावरणात ५८ वर्षाचे विश्वनाथ पाटील यांनी पहाटे ५ वाजता अलिबाग येथील रायगड पोलीस मुख्यालयातून धावण्यास सुरुवात केली. कार्लेखिंड-पोयनाड-वडखळ असे टप्पे पार करत ते साई मंदिर (पेण) येथे पोहचले. तेथून त्यांनी अलिबागकडे येण्याचा परतीचा प्रवास सुरु केला.
त्यावेळी रस्त्यावरील वर्दळ वाढली होती. जखमी असलेला पाय दुखू लागला होता. पाठ दुखत होती. परंतु पाटील यांनी आपली जिद्द सोडली नाही. मध्येच स्प्रे मारत होते. वेग काहीसा मंदावला होता. परंतू मन थांबत नव्हते. लक्ष पोलीस मुख्यालयाकडे लागले होते. मुन्ना मास्तर व हवालदार सी. एम. पाटील सोबत धावून विश्वनाथ पाटील यांना प्रोत्साहन देत होते. कार्लेखिंड खिंड ओलांडली आणि धीर आला. विश्वनाथ पाटलांचा आत्मविस्वास वाढला. चेह-यावर तेज आले. काहीसा वेग वाढला. मुख्यालयात पोलीस जवान विश्वनाथ पाटील कुठे पोहचलेत याची खबर घेत होते. सर्वांनाच उत्सुकता लागली होती. सलग ७ तास ४५ मिनिटे धावून जिद्दी विश्वनाथ पाटील १२.४५ वाजता अलिबाग येथील पोलीस मुख्यालयात पोहचले तेव्हा पोलीस दलातील जवानांनी आपल्या या गुरुचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. पोलीस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे अभिनंदन केले. रायगडचे जिल्हा पोलीस अधिक्षक मो. सुवेझ हक यांनीही पाटील यांच्या या अनोख्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आहे.
पेण तालुक्यातील वाशी हे विश्वनाथ पाटील यांचे मूळ गाव. पेण खारेपाटातील असल्यामुळे कबड्डी हा त्यांचा आवडता खेळ. कबड्डीपटू विश्वनाथ पाटील १९७७ मध्ये रायगड जिल्हा पोलीस दलात पोलीस खेळाडू म्हणून कॉन्स्टेबल पदावर भारती झाले. उत्तम कबड्डीपटू असलेल्या पाटील यांनी चमकदार कामगिरी करत याच रायगड पोलीस दलात ‘पोलीस उपनिरीक्षक’ पदापर्यंत मजल मारली. १९९३ ते २००६ या कालावधीत त्यांनी रायगड जिल्हा पोलीस दलाचे क्रीडा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली. रायगड पोलीसच्या कबड्डी संघास त्यांनी विशेष प्रशिक्षण दिले आणि या संघाने जिल्हा व राज्य स्तरावर विविध स्पर्धा जिंकून आगळा विक्रम प्रस्थापित केला. रायगड पोलीस दलाबरोबरच महसूल विभागातील खेळाडूंना देखील त्यांनी मैदानी खेळ तसेच कबड्डीचे प्रशिक्षण दिले. त्यांनी अनेक खेळाडू घडवले. पाटील यांच्या कामगिरीची दखल घेवून २०१४ मध्ये त्यांना पोलीस महासंचालक पदक तर २०१५ मध्ये अत्यंत मानाचे राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करुन गौरविण्यात आले आहे.
“कुठलाही विक्रम करण्याचा माझा मानस नव्हता. विक्रमासाठी मी धावलो नाही. पोलीस दलातील तरुणांसोर आदर्श ठेवण्याकरिता मी ५८ किमी धावलो.” – विश्वनाथ पाटील, पोलीस उपनिरीक्षक