तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाईल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.
नवी दिल्ली- तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनी गुगलने आता भारतातील मोबाईल पेमेंटच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. ग्राहकांसाठी तेज या अॅपद्वारे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आधारित डिजिटल पेमेंट सेवा सोमवारी गुगलने लाँच केली आहे. या अॅपद्वारे पैसे पाठवणे, बँक खात्यात थेट पैसे स्वीकारणे, बिल पेमेंट अशा सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. तसेच, हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर ग्राहकाला ते थेट बँक खात्याशी जोडता येईल. तेज अॅपद्वारे पैशांचे ट्रान्सफर सोपे आणि सुरक्षित असेल असे गुगलकडून सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या अॅपच्या माध्यमातून आपल्याला जादा इन्कम मिळवता येणार आहे. यासाठी आपल्या मित्रांना तेज अॅपचा वापर करायला सांगितले पाहिजे. जर एका महिन्यात तुम्ही आपल्या २० मित्रांना तेज अॅपचा वापर करण्यास सांगितले आणि ते यशस्वी झाले तर तुम्हाला यातून १००० रुपयांचा फायदा होणार आहे. याशिवाय या अॅपच्या माध्यमातून इतर ऑफर्समधून सुद्धा आपल्याला इन्कम मिळवता येणार आहे. जसे की, तुम्ही भीम अॅप दुस-यांना वापरण्यास सांगितले की, १० रुपयांचा फायदा होतो. त्याचप्रमाणे गुगलच्या तेज अॅपमधून तुम्हाला फायदा करता येणार आहे. एका मित्राला तुम्ही जर तेज अॅप वापरायला सांगितले की तुम्हाला ५१ रुपये मिळणार आहेत. यासाठी गुगलने नियम आणि अटी स्पष्ट केल्या आहेत. यामध्ये जर तुमच्या सल्ल्यानुसार महिन्याला अधिकाअधिक ५० मित्रांनी तेज अॅपचा वापर केला, तर तुम्ही २५५० रुपये मिळवू शकता.
काय आहे तेज अॅप?
यूपीआयद्वारे तुम्ही तुमचे बँक खाते तेज अॅपशी जोडल्यानंतर तुम्ही अत्यंत सुलभतेने एका बँकेतून दुस-या बँकेत रक्कम ट्रान्सफर करू शकता. या अॅपमध्ये सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. गुगलच्या विविधस्तरीय सुरक्षा प्रणालीमुळे हे अॅप वापरण्यास सुरक्षित असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले आहे. तेजमधील कॅश मोडचा वापर करून तुम्ही तात्काळ एखाद्याला पैसे पाठवू शकता किंवा पैसे स्विकारू शकता. त्यासाठी तुम्हाला फोन किंवा बँक अकाऊंटचा नंबर अशी खासगी माहिती शेअर करण्याची गरज नाही. तेज अॅपवर इंग्रजी, बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नडा, मराठी, तामिळ आणि तेलगु भाषा उपलब्ध असतील. तेजमधील कॅश मोडचा वापर करून तुम्ही जागीच चहावाला, दूधवाला, सलूनवाला यांना डिजिटल पेमेंट करू शकता. या अॅपद्वारे डेबिट आणि क्रेडिट कार्डने पेमेंट करायची सुविधा सुद्धा लवकरच उपलब्ध होणार आहे.