मुंबई येथील ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली असून नव्या दरानुसार गृहकर्जावर अवघे ८.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे.
मुंबई- मुंबई येथील ग्रेटर बॉम्बे को-ऑपरेटिव्ह बँकेने आपल्या गृहकर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली असून नव्या दरानुसार गृहकर्जावर अवघे ८.५ टक्के व्याज आकारले जाणार आहे. बुधवार ८ फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे.
विशेष म्हणजे महिला ग्राहकांनी हे कर्ज घेतल्यास त्यांना ०.१० टक्क्यांची अतिरिक्त सूट देण्यात येणार असून त्यांच्यासाठी व्याजदर ८.४० टक्के इतका असणार आहे. ८ फेब्रुवारीनंतर मंजूर होणा-या ७० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाना नवा व्याजदर लागू राहणार असून इतर बँकांकडून ग्रेटर बँकेकडे आपले कर्ज ट्रान्सफर करणा-या ग्राहकांसाठी प्रोसेसिंग फी माफ करण्यात आली आहे.
बँकेच्या या निर्णयामुळे मालमत्ता खरेदीला चालना मिळण्यासह सर्वसामान्यांचे स्वत:च्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल, असे ग्रेटर बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा रामदेव यांनी सांगितले आहे.
विशेष म्हणजे ग्रेटर बँकेने नॅशनल हाऊसिंग बँकेसोबत करार केला असून या करारान्वये गृहकर्ज घेणा-या ग्राहकांना प्रधानमंत्री आवास योजनेचे अनुदानही मिळवता येणार आहे.