गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने दोन संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केली आहे. या दोघांना कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
अहमदाबाद- गुजरातमधील दहशतवादविरोधी पथकाने दोन संशयित पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक केली आहे. या दोघांना कच्छ जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. कच्छ जिल्ह्यातील खावडा गावात दोन पाकिस्तानी गुप्तहेर असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली होती.
गेल्या एक वर्षापासून या पाकिस्तानी गुप्तहेरांवर दहशतवादविरोधी पथक नजर ठेवून होते. अखेर गुरुवारी दहशतवादविरोधी पथकाने त्यांना अटक केली असून त्यांच्याकडून सिम कार्ड आणि एक मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
अलाना समा आणि शकुर सुमरा अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सात महत्त्वाचे दस्तऐवज, एक पाकिस्तानी सीमकार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे दोघेही भारतीय आहेत. या अटक केलेल्या दोघांनी महत्त्वाची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.
या दोघांची चौकशी सुरू माहिती गुजरात एटीएसचे उपायुक्त बी. एस. चावडा यांनी दिली आहे. दोघेही ड्रोन आणि फोन कॅमे-याच्या मदतीने महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो काढून ते पाकिस्तानमध्ये पाठवत असल्याचे त्यांच्या चौकशीत उघड झाले आहे.