पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याची अखेर गुजरातमध्ये ‘घरवापसी’ झाली आहे.
अहमदाबाद- पाटीदार समाजाचा युवा नेता हार्दिक पटेल याची अखेर गुजरातमध्ये ‘घरवापसी’ झाली आहे. पाटीदार समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी त्याने केलेल्या उग्र आंदोलनानंतर सरकारने त्याना तुरुंगात धाडले होते. तिथून मागील वर्षी जुलै महिन्यात सुटका झाल्यानंतर ६ महिने राज्याबाहेर जाण्याचे आदेश त्याला न्यायालयाने दिले होते. त्यामुळे तो राजस्थानात वास्तव्यास होता. मंगळवारी त्याच्या समर्थकांनी गुजरात-राजस्थान सीमेवरील रतनपूर येथे त्याचे जंगी स्वागत केले. यानंतर लगेचच तो हिम्मतनगर येथे सभा घेण्यासाठी रवाना झाला.
पाटीदार समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी २३ वर्षीय हार्दिक पटेल याच्या नेतृत्वाखाली पाटीदार अनामत आंदोलन समितीची स्थापना करण्यात आली होती. या आंदोलनाने उग्र रूप घेतल्यानंतर सरकारने हार्दिक पटेलवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. अनेक महिने तुरुंगात राहिल्यानंतर जुलै २०१६ मध्ये त्याची सुटका झाली होती.
हार्दिक गुजरातमध्ये परतल्यानंतर पाटीदार समाजाने पुन्हा एकदा आरक्षाची हाक दिली असून यासाठी हिम्मतनगर येथे सभेचेही आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. या सभेला पाटीदार समाजाने ‘आरक्षणासाठी आंदोलनाच्या दुस-या टप्प्याची सुरुवात’ असे नाव दिले होते.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी आपण सकारात्मक चर्चेसाठी तयार असून आंदोलकांचे मुद्दे निकाली काढण्याकडे आमचा भर असेल, असे म्हटले आहे. त्यामुळे हार्दिक पटेलच्या आगमनानंतर सरकारने नरमाईची भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. हार्दिक याने हिम्मतनगर येथील सभेनंतर सायंकाळी गांधीनगर येथे जाऊन माजी मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांची भेट घेतली, तर रात्री तो छात्र संसदेसाठी पुण्याला रवाना झाला.