खालापूर टोलनाक्याजवळ पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली.
पुणे- खालापूर टोलनाक्याजवळ पेट्रोलच्या टँकरला आग लागल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून वाहतूक पर्वपदावर आली. मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर रविवारी सकाळच्या सुमारास भोकरपाडा येथे ही घटना घडली.
पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे. वाहतूक कोंडीमुळे पर्यायी मार्ग म्हणून या मार्गावरची वाहतूक सावलामार्गे वळविण्यात आली आहे.
एक पेट्रोलचा टँकर पलटी झाल्याने त्यातील पेट्रोल रस्त्याच्या कडेला सांडले. हे पेट्रोल एक किलोमिटर पर्यंत वाहत गेले. काही अंतरावर बिडी पेटवलेली असल्याने पेट्रोलने पेट घेतला. आग टँकरपर्यंत पोचल्याने टँकरनेही पेट घेतला.
अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात यश आले आहे मात्र या घटनेत टँकर जळून खाक झाला आहे. तर मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतूक मंद गतीने सुरु आहे. या घटनेमुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.