प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील साखळी लढतीत बुधवारी जयपूर पिंक पँथर्सनी यजमान बंगळूरु बुल्सला २४-२२ असे हरवले.
बंगळूरु- प्रो-कबड्डी लीगच्या चौथ्या हंगामातील साखळी लढतीत बुधवारी जयपूर पिंक पँथर्सनी यजमान बंगळूरु बुल्सला २४-२२ असे हरवले. जयपूरचा हा सलग तिसरा विजय आहे. बंगळूरुवर सलग चौथ्या पराभवाची नामुष्की ओढवली.
वास्तविक पाहता मध्यंतराला १५-९ अशी मोठी आघाडी असल्याने जयपूर पिंक पँथर्स मोठया फरकाने जिंकतील, असे वाटले. मात्र दुस-या सत्रात बंगळूरुने खेळ उंचावला. आशिष कुमारने अप्रतिम खेळ करताना प्रतिस्पर्ध्याची आघाडी १५-१४ अशी कमी केली. २६व्या मिनिटाला बंगळूरुने सामन्यात प्रथमच १७-१६ अशी निसटती आघाडी घेतली.
मात्र शेवटच्या मिनिटांमध्ये जयपूरने सावध खेळ करताना पाचवा विजय नोंदवला. पाच यशस्वी चढाया करणारा कर्णधार जसवीर सिंग तसेच राजेश नरवाल (प्रत्येकी ५ गुण) तसेच अमित हुडासह (४ गुण) रन सिंग आणि अजय कुमारने (प्रत्येकी ३ गुण) विजयात मोलाचा वाटा उचलला. बंगळूरुतर्फे रोहित कुमारसह (५ गुण), दीपक कुमार दहिया, मोहित चिल्लर तसेच कर्णधार सुरेंदर नाडाने (प्रत्येकी ३ गुण) मिळवत जयपूरला झुंजवले. बुधवारच्या विजयासह आठ सामन्यांतून ३० गुणांसह जयपूरने अव्वल स्थान मिळवले आहे. यजमान बंगळूरु संघ (९ सामन्यांत २१ गुण) सहाव्या स्थानी आहे.
आजचे सामने (१४ जुलै)
» जयपूर पिंक पँथर्स वि. यू मुंबा (रा. ८ वा.)
» बंगळूरु बुल्स वि. पाटना पायरेट्स (रा. ९ वा.)