जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.
श्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये मंगळवारी झालेल्या दोन चकमकींमध्ये चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. यावेळी ३ जवानांना वीरमरण आले, तर ९ जवान व १ नागरिक जखमी झाले आहेत. पहिली चकमक बांदीपुरा जिल्ह्यातील हाजीन विभागात परे मोहल्ला येथे झाली.
या ठिकाणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात १० जवान जखमी झाले, त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.
दुसरी चकमक कुपवाडा जिल्ह्यातील करालगुंड येथे झाली. यात एका घरात लपलेल्या ३ दहशतवाद्यांचा सुरक्षा पथकांनी खात्मा केला. यावेळी एक जवान जखमी झाला. कुलगाम जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते.
यानंतर काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी निदर्शने करत बंद पुकारला होता. त्यानंतर मिळालेल्या माहितीनंतर मंगळवारी पुन्हा चकमक होऊन चार दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात आले.