सध्या जिथं लावणीचा ऊस तुटलाय, तिथं खोडवा ऊस लागवडीची तयारी सुरू आहे. खोडवा उसाला खताचा वेळेवर हप्ता दिला तर लावणीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळतं, असा शेतक-यांचा अनुभव आहे.
कोल्हापूर- सध्या जिथं लावणीचा ऊस तुटलाय, तिथं खोडवा ऊस लागवडीची तयारी सुरू आहे. खोडवा उसाला खताचा वेळेवर हप्ता दिला तर लावणीच्या तुलनेत अधिक उत्पादन मिळतं, असा शेतक-यांचा अनुभव आहे. मात्र हे खत देण्यासाठी शेतक-यांनाही बरीच मेहनत करावी लागते. मजुरांची समस्या भेडसावते. ही मेहनत वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या एका शेतक-याने एक यंत्र तयार केलं आहे.
दातेरी चाकं असणारं हे नवं यंत्र नाही तर पॉवर ट्रेलरच आहे. कोल्हापुरातील मिलिंद पाटील या तरुण शेतक-याने हे तयार केलं आहे. खोडवा उसाला खत द्यायचं काम हे यंत्र अगदी कमी वेळात आणि कमी कष्टात करतं. खोडवा उसापासून चांगलं उत्पादन मिळवण्यासाठी त्याला वेळेवर खत देणं गरजेचं असतं.
पारंपरिक पद्धतीत पहारीच्या मदतीने उसाच्या बुडख्याजवळ खड्डा करून खतं दिली जातात. यामध्ये वेळ आणि पैसा जातो. शिवाय ग्रामीण भागात मजुरांची समस्या ठरलेलीच. यावर मात करण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील पिसात्रीच्या मिलिंद पाटील यांनी एक नामी शक्कल लढवली आणि पॉवर ट्रेलरलाच ही दातेरी चाकं जोडली.
या एका चाकाचं वजन ३५ किलो असून यावर बसविलेल्या पहार पद्धतीच्या कोनाची उंची ४ इंच आणि रुंदी २ इंच आहे. एका चाकावर आठ पहारीच्या आकाराचे कोन असून एक चाकाचा फेरा पूर्ण झाल्यानंतर जमिनीत आठ नाळे किंवा होल पडतात आणि उसाला सहजरित्या खत देता येतं. खोडवा उसाला खत देण्यासाठी मिलिंद यांच्या पत्नीला मजूर शोधण्यासाठी मोठा त्रास व्हायचा. मजूर मिळाले तरी पाहिजे तसं काम होईलच असं नाही. मजुरीची खर्चही भरमसाट होता; मात्र या यंत्राच्या निर्मितीनंतर त्यांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही.
हे यंत्र बनवण्यासाठी मिलिंद यांना ५ हजार रुपये खर्च आला आहे. अवघ्या २ तासांत या यंत्राद्वारे एका एकरावरील खोडवा उसाला खत देता येतं. यासाठी फक्त २ लिटर डिझेल लागतं, म्हणजेच एकरी फक्त १२० रुपये खर्च. पावणेचार फुटांच्या सरीतील खोडवा उसाला खत देण्यासाठी हे यंत्र बनवलं गेलंय.
मात्र शेतकरी त्यांच्या गरजेनुसार या यंत्रात बदलही करू शकतात. कष्ट, पैसा आणि वेळ हे यांत्रिकीकरणामुळे वाचतात. हेच यांत्रिकीकरण मिलिंद यांनी अंगिकारलं आणि घराच्याच वस्तूपासून यंत्राची निर्मिती केली. हे यंत्र आता पंचक्रोशीतील शेतक-यांत फेमस झाले आहे.