घरच्या कामगिरीवर सातत्य राखताना माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर ४५ धावांनी विजय मिळवला.
चेन्नई – घरच्या कामगिरीवर सातत्य राखताना माजी विजेता चेन्नई सुपर किंग्जने शनिवारी सनरायझर्स हैदराबादवर ४५ धावांनी विजय मिळवला. सलामीवीर ब्रेंडन मॅककलमची (५६ चेंडूंत नाबाद १०० धावा) नाबाद शतकी खेळी त्यांच्या सलग दुस-या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले. आठव्या मोसमातील पहिले शतक ठोकण्याचा मान मॅककलमने मिळवला.
चेन्नईचे २१० धावांचे आव्हान पार करताना हैदराबादला ६ बाद १६४ धावाच करता आल्या. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने (४२ चेंडूंत ५३ धावा) एक बाजू लावून धरली तरी अन्य फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे एकतर्फी लढत झाली. मध्यमगती मोहित शर्मा आणि ड्वायेन ब्राव्होने (प्रत्येकी २ विकेट) अचूक मारा करताना विजयात मोलाचे योगदान दिले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना फटकेबाज मॅककलमने चेन्नईला ४ बाद २०९ धावा करून देताना विजय नक्की केला. मॅककलमने ७ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांसह ५६ चेंडूंत १०० धावांची खेळी केली. मॅककलमने हैदराबादचा लेगब्रेक करन शर्मा आणि मध्यमगती इशांत शर्माला लक्ष्य केले. शेवटच्या षटकांत शतकासाठी त्याला ११ धावांची आवश्यकता होती.
धोनी आणि जडेजा लागोपाठच्या चेंडूंवर बाद झाले तरी पुढील दोन चेंडूंवर षटकार आणि चौकार ठोकत मॅककलमने ९९ धावांवर झेप घेतली. बोल्टच्या शेवटच्या चेंडूवर कव्हरला एक धाव घेत त्याने शतक पूर्ण केले.
शेवटच्या चेंडूवर शतक पूर्ण करणा-या मॅककलमने ड्वायेन स्मिथसह ७५ धावांची सलामी तसेच कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह (२९ चेंडूंत ५३ धावा) तिस-या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी करताना मॅककलमने चेन्नईला दोनशेपार नेले. यंदाच्या मोसमातील ही सर्वाधिक (४ बाद २०९ धावा) धावसंख्या आहे. मॅककलमनंतर धोनीनेही फटकेबाजी करताना ४ चौकार आणि तितकेच षटकार खेचले. शतकवीर मॅककलमलाच सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : चेन्नई – ४ बाद २०९ (मॅककलम नाबाद १००, धोनी ५३) वि. हैदराबाद – ६ बाद १६४ (वॉर्नर ५३, ब्राव्हो २५-२, मोहित ३६-२). निकाल : चेन्नई ४५ धावांनी विजयी. सामनावीर : ब्रेंडन मॅककलम.