आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे.
नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार करून सरकार आणि प्रशासनावरील पकड घट्ट करत असताना काँग्रेस, आम आदमी पक्षाने आपापल्या रिसर्च टीम मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. पंतप्रधान मोदींकडून केले जाणारे दावे आणि सद्यपरिस्थिती यांच्यामधील फरक दाखवून देण्याचे काम या टीमकडे असणार आहे.पत्रकार परिषद आणि समाज माध्यमांवरून भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी आकडेवारी संकलित करण्याची जबाबदारी रिसर्च टीमकडे असेल. याआधी जानेवारीमध्ये मोदी सरकारकडून संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाणार होते.
त्याआधी काँग्रेसच्या रिसर्च टीमने अर्थतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, माजी नोकरशहा, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या मदतीने अर्थ क्षेत्राशी संबंधित आकडेवारी गोळा केली होती. या आकडेवारीच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या अहवालाची प्रस्तावना माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी लिहिली होती. ‘अर्थव्यवस्थेचे वास्तव’ असे नाव या अहवालाला देण्यात आले होते. मोदी सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्थेची अवस्था कशी झाली आहे, हे सांगण्याचा प्रयत्न या अहवालातून करण्यात आला. मागील तीन वर्षांपासून काँग्रेसच्या रिसर्च टीममध्ये आठ जण काम करत आहेत.
आता या टीमचा विस्तार केला जाणार आहे. या टीमचे नेतृत्त्व काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार राजीव गौडा यांच्याकडे देण्यात आले आहे. तर आम आदमी पक्षाच्या रिसर्च टीममध्ये विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या ३० स्वयंसेवकांचा समावेश आहे. यामध्ये युवा नेत्या आतिशा मालेर्ना आणि आमदार सौरभ भारद्वाज यांचा सहभाग आहे.आम आदमी पक्षाचे संशोधन प्रमुख असलेले अर्जुन जोशी यांच्यासोबत एका इंग्रजी संकेतस्थळाने संवाद साधला. स्वयंसेवकांना दोन-दोन महिन्यांची इंटर्नशिप देऊन आमच्या रिसर्च टीमची सुरुवात झाली होती, अशी माहिती जोशी यांनी दिली. त्यावेळी आमच्या टीममध्ये इंटर्नशिप करणारे अनेकजण होते. मात्र आता आमची टीम निश्चित झाली आहे. सध्या आमच्याकडे ३० जणांची टीम आहे. टीममधील सगळ्यांचे वय २६ पेक्षा कमी आहे. इतिहास, राज्यशास्त्र, गणित, अभियांत्रिकी या क्षेत्रातील तरुण-तरुणींचा आमच्या टीममध्ये भरणा आहे.
[EPSB]
धावत्या लोकलमधून तरुणीला फेकून दिले
[/EPSB]