मुंब्रातील मुस्लीम तरूणांनी एका हिंदू वृध्दाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन माणूसकीचे दर्शन घडविले आहे.
ठाणे : मुंब्रातील मुस्लीम तरूणांनी एका हिंदू वृध्दाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करुन माणूसकीचे दर्शन घडविले आहे.
वामन कदम (६५) हे कौसा भागात त्यांच्या पत्नीसह राहात होते. कदम यांचे निधन झाल्यानंतर रात्री उशीरा पर्यंत त्यांच्या मृतदेहावर अंतिम संस्कारासाठी कोणीही आले नाही.
यावेळी त्याभागातील मुस्लीम तरुणांनी एकत्र येऊन अंतिम संस्कारासाठी लागणा-या सामग्रीची जमवाजमव करुन हिंदू धर्मपध्दतीने पहाटे तीन वाजेच्या सुमारास कदम यांच्या मृतदेहावर अंतीम संस्कार केले.
खलील, फावद दबीर, नवाज दबीर, राहील दबीर, शाबन खान, मकसूद खान, फारूक खान, महंमद कासम शेख अशी या तरूणांची नावे आहेत.
मुस्लीमबहुल भागात मुस्लीम तरुणांनी केलेल्या या कार्याचे स्थानीक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केले.