दुसरी वनडे ६७ धावांनी जिंकत न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
नेल्सन- दुसरी वनडे ६७ धावांनी जिंकत न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली.
गुरुवारी झालेल्या लढतीत यजमानांनी सर्व आघाडय़ांवर वर्चस्व राखले. न्यूझीलंडच्या २५२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचा डाव ४२.४ षटकांत १८४ धावांत संपला. सलामीवीर तमिम इक्बालला (१६) लवकर बाद करण्यात वेगवान गोलंदाज टिम साऊदीला यश आले तरी अन्य सलामीवीर इम्रुल कायेसने (५९) ‘वनडाऊन’ सब्बीर रहमानसह (३८) दुस-या विकेटसाठी ७५ धावा जोडताना पाहुण्यांचे शतक फलकावर लावले.
२३व्या षटकात १ बाद १०४ अशा सुस्थितीत बांगलादेश संघ होता. मात्र पुढील ४३ षटकांत त्यांच्या डावाची इतिश्री झाली. आघाडी आणि मधली फळी कोसळल्याने उर्वरित ९ विकेट केवळ ८० धावांत पडल्या. महमुदुल्ला (१), शाकीब-अल-हसन (७), मोसाद्देक होसेन (३) आणि तन्बीर हैदर (२) झटपट परतले.
तळातील नुरुल हसन (२४) आणि कर्णधार मश्रफे मोर्ताझाने (१७) थोडा प्रतिकार केल्याने पाहुण्यांना दोनशेच्या घरात पोहोचता आले. न्यूझीलंडतर्फे ‘पार्टटाईम’ ऑफस्पिनर केन विल्यमसनने तीन विकेट घेत प्रतिस्पध्र्याना लवकर गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टसह टिम साऊदीने प्रत्येकी दोन विकेट घेत त्याला सुरेख साथ दिली.
तत्पूर्वी, नील ब्रुमच्या (१०९) नाबाद शतकाच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकांत २५१ धावांची मजल मारली. ब्रुमच्या पहिल्यावहिल्या शतकाव्यतिरिक्त अन्य कुठल्याच फलंदाजाला चाळीशीही पार करता आली नाही. त्याच्यानंतर सर्वाधिक ३५ धावा यष्टिरक्षक ल्युक राँचीच्या आहेत. ब्रुमने १०७ चेंडूंत नाबाद १०९ धावांची खेळी केली. त्यात ८ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे.
बांगलादेशतर्फे मध्यमगती गोलंदाज मश्रफे मोर्ताझाने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. त्याला तस्किन अहमद आणि शाकीब-अल-हसनची (प्रत्येकी २ विकेट) चांगली साथ लाभली. फटकेबाज शतकी शतक ठोकणा-या नील ब्रुमला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सलग दुस-या विजयासह न्यूझीलंडने तीन सामन्यांच्या मालिकेवर २-० असा कब्जा मिळवला. उभय संघातील तिसरी आणि अंतिम वनडे याच मैदानावर (नेल्सन) शनिवारी (३१ डिसेंबर) खेळवली जाणार आहे. परंतु, मालिकेचा निकाल लागल्याने तिस-या लढतीला फारसे महत्त्व उरलेले नाही.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड – ५० षटकांत सर्वबाद २५१(नील ब्रुम नाबाद १०९, ल्युक राँची ३५, मश्रफे मोर्ताझा ४९-३) वि. बांगलादेश – ४२.४ षटकांत सर्वबाद १८४(इम्रुल कायेस ५९, सब्बीर अहमद ३८, केन विल्यमसन २२-३, ट्रेंट बोल्ट २६-२). निकाल : न्यूझीलंड ६७ धावांनी विजयी. तीन सामन्यांच्या मालिकेत २-० आघाडी. सामनावीर : नील ब्रुम.