विधान सभेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे ठेवायचे याचा रिमोट कंट्रोल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याकडेच आहे, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे.
पुणे- महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे ठेवायचे याचा रिमोट कंट्रोल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याकडेच आहे, असा टोला आमदार नितेश राणे यांनी लगावला आहे. पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारिणी बेकायदेशीररीत्या बरखास्त केल्यानंतर नारायण राणे यांनी आपल्या आमदारकीसह काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्याचबरोबर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नीलेश राणे यांनीही सदस्यत्वाचा राजीनामा दिला. मात्र आमदार नितेश राणे यांनी अद्याप काँग्रेसचा राजीनामा दिलेला नाही. या पार्श्वभूमीवर पुण्यात पत्रकारांनी त्यांना विविध प्रश्न विचारले. मात्र नितेश राणे यांनी अत्यंत संयमाने पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा एक आमदार जास्त असल्याने काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. याबाबत नितेश राणे यांना विचारले असता, ते म्हणाले की, विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय नारायण राणे यांच्यावर अवलंबून आहे. योग्य वेळ येईल तेव्हा ते चॅनेल बदलतील, असे नितेश राणे म्हणाले.
दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आहे, असे सांगून नितेश राणे म्हणाले की, देव जो आशिर्वाद देईल तो आम्ही मान्य करू. लवकरच राजकीय निर्णय जाहीर केला जाईल, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेचे आणि महाराष्ट्राचे रक्षण कर, असे साकडे देवाला घातले आहे. नारायण राणे २५ तारखेला आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहेत, याबाबत विचारले असता, अशी कोणतीही माहिती आपल्याकडे नसल्याचे ते म्हणाले.