भारतातील टपाल कार्यालयांत पोस्टल बँका सुरू करण्यात येणार आहेत. बँकिंग सेवांचे कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे अन्य बँका आणि पोस्ट यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे.
नवी दिल्ली- भारतातील टपाल कार्यालयांत पोस्टल बँका सुरू करण्यात येणार आहेत. बँकिंग सेवांचे कामकाज पाहण्यासाठी स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात येणार असून त्याद्वारे अन्य बँका आणि पोस्ट यांना एकमेकांशी जोडले जाणार आहे. पोस्टाच्या एटीएममध्ये आता अन्य सार्वजनिक बँकांचे एटीएम वापरता येणार आहे. रिझव्र्ह बँक त्यासाठी लवकरच परवानगी देणार आहे.
पेमेंट बँका चालवण्यासाठी गेल्याच वर्षी भारतीय टपाल खात्याला परवानगी देण्यात आली असून सुरुवातीला फारसे काही टपाल खाते करू शकलेले नाही. अर्थ मंत्रालयातील अधिका-याने सांगितले की, पोस्टाचे एटीएम आणि इतर बँका यांच्यात इंटरऑपरेटिबिलिटी आणण्याची आमची इच्छा आहे.
पोस्टाने स्वतंत्र बँक सुरू केली तरच आम्ही तशी परवानगी देऊ शकतो, असे आरबीआयने सांगितले आहे. कारण आरबीआयचा अधिकार फक्त बँकांवर चालतो. पोस्ट खात्याने यावर सकारात्मक भूमिका घेतली असून तशी बँक तयार करण्याचे मान्य केले आहे.
या बँकेचे मुख्यालय बंगळुरू येथे असणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना आपल्या पोस्टातील रक्कम बँकेत वळवता येईल, तसेच कोणत्याही बँक खात्यातून रक्कम काढण्यासाठी पोस्टाच्या एटीएमचा उपयोग करता येईल. ही शाखा पोस्ट बँकेचा परवाना चालवण्यासाठीच सुरू केली जाईल आणि नंतर पोस्ट बँकेत ती विलीन केली जाईल. देशभरात पोस्टाची २८,००० कार्यालये असून दीड लाख ग्रामीण टपाल कार्यालये आहेत.