पारंपरिक ‘सांबा’ नृत्यासह नेत्रदीपक रोषणाई तसेच अभूतपूर्व जल्लोषात ३१व्या ऑलिंपिकला शुक्रवारी रिओ दी जानिरो शहरात सुरुवात झाली.
रिओ दी जानिरो- पारंपरिक ‘सांबा’ नृत्यासह नेत्रदीपक रोषणाई तसेच अभूतपूर्व जल्लोषात ३१व्या ऑलिंपिकला शुक्रवारी रिओ दी जानिरो शहरात सुरुवात झाली. ब्राझीलमध्ये फुटबॉल सर्वाधिक प्रसिद्ध आहे. मात्र ऑलिंपिक स्पर्धाच्या आयोजनाने त्यांचे ‘स्पोर्ट्स कल्चर’ बदललेले पाहायला मिळाले.
तब्बल चार तास रंगलेल्या सोहळयात २०९ देशांचे ११ हजारहून अधिक क्रीडापटू सहभागी झाले होते. ब्राझीलचे हंगामी राष्ट्राध्यक्ष मिकेल टेमेर यांनी ब्राझीलसह दक्षिण अमेरिकेत होणा-या पहिल्या-वहिल्या ऑलिंपिक स्पर्धेची घोषणा केली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक तसेच संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान-की-मून यांची प्रमुख उपस्थिती होती.
ऑलिंपिकच्या अधिकृत घोषणेनंतर ब्राझीलच्या पारंपरिक ‘सांबा’ नृत्याची झलक पाहायला मिळाली. त्यानंतर अनेक नृत्यपर कार्यक्रमही झाले. उद्घाटन सोहळयादरम्यान संपूर्ण मॅराकाना स्टेडियम रोषणाईने उजळून निघाले होते. या रोषणाईने स्टेडियमवर जमलेले तब्बल ७८ हजारहून अधिक प्रेक्षक थक्क झाले.
क्रीडापटूंच्या ‘परेड’ची सुरुवात ऑलिंपिक स्पर्धाचे उगमस्थान असलेल्या ग्रीस संघापासून झाली. यजमान ब्राझील संघाचे आगमन सर्वात शेवटी झाले. भारताचा क्रमांक ९५वा होता. भारताच्या पथकाचे नेतृत्व अनुभवी नेमबाज अभिनव बिंद्राने केले. या पथकात एकूण सहभागी ११८ क्रीडापटूंपैकी ७० क्रीडापटू सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत २४ प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा समावेश होता. भारताचे पुरुष क्रीडापटू पारंपरिक निळया ब्लेझरमध्ये दिसले.
महिला क्रीडापटूंनी साडी परिधान केली होती. बिंद्रासह विक्रमी सातवे ऑलिंपिक खेळणारा टेनिसपटू लिअँडर पेस, महिला एकेरी बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, दुहेरी बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पा तसेच महिला जिम्नॅस्टिकपटू दीपा कर्माकर तसेच सपोर्ट स्टाफमध्ये पथकप्रमुख राकेश गुप्ता तसेच उपपथकप्रमुख आनंदेश्वर पांडे यांचा परेडमध्ये समावेश होता.
आर्यलडविरुद्धच्या सलामीच्या लढतीमुळे हॉकीपटू उद्घाटन सोहळयात सहभागी झाले नाहीत. त्यांच्यासा तिरंदाज, टेबलटेनिसपटू आणि वेटलिफ्टरही सोहळयाला अनुपस्थित राहिले.
अमेरिकेच्या ५०० जणांच्या पथकाचे नेतृत्व विक्रमवीर जलतरणपटू मायकेल फेल्प्सने केले. त्याच्यासह स्पेन आणि ब्रिटनचा ध्वजवाहक अनुक्रमे टेनिसपटू राफाएल नाडाल आणि अँडी मरेच्या ‘एंट्री’वेळी उपस्थितांनी टाळय़ांचा कडकडाट केला.
जमैकाच्या पथकात ६० क्रीडापटूंचा समावेश होता. मात्र विश्वविक्रमी धावपटू उसेन बोल्ट सहभागी झाला नाही. महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते ऑलिंपिक क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन केले जाणार होते. मात्र उद्घाटन सोहळयाला ते उपस्थित राहू शकले नाहीत.
दत्तू भोकनळ उपांत्यपूर्व फेरीत
भारताच्या दत्तू भोकनळने रोईंग क्रीडा प्रकारातील पुरुषांच्या एकेरी स्कल २००० मीटर रेस प्रकाराच्या पात्रता फेरीत (हीट) तिसरा क्रमांक मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ‘हीट’मध्ये शनिवारी पाचव्या लेनमध्ये असलेल्या नाशिकच्या दत्तूने शानदार आश्वासक सुरुवात केली. तसेच सातत्य राखले. त्याने २००० मीटर अंतर ७:२१:६७ सेकंदात पार केले.
या ‘हीट’मध्ये पहिल्या स्थानी क्युबाचा अँजेल रॉड्रिग्ज (७:०६:८९ सेकंद) आणि दुस-या स्थानी मेक्सिकोचा हुआन कालरेस कॅब्रेरा (७:०८:२७ सेकंद) आहे. पहिल्या पाचशे मीटरमध्ये भोकनळ दुस-या स्थानी होता.
मात्र ७०० मीटरच्या आसपास दुस-या लेनमधील मेक्सिकोच्या कॅब्रेरानेने त्याला ‘ओव्हरटेक’ केले. क्युबाच्या रॉड्रिग्जने सुरुवातीपासून घेतलेली आघाडी राखली. मात्र दत्तूने सातत्य राखताना पहिल्या तिघांमध्ये स्थान मिळवले. रोईंग प्रकारात दत्तू बबन भोकनळच्या रूपाने भारताचा एकमेव क्रीडापटू सहभागी झाला आहे.