भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह किदांबी श्रीकांतच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांनी वाढ झाली आहे.
नवी दिल्ली- भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालसह किदांबी श्रीकांतच्या रँकिंगमध्ये दोन स्थानांनी वाढ झाली आहे. जागतिक बॅडमिंटन फेडरेशनच्या ताज्या क्रमवारीत सायना सहाव्या स्थानी आहे.
गेल्या आठवडयात झालेली ऑस्ट्रेलियन ओपन सुपरसीरिज स्पर्धा जिंकलेल्या २६ वर्षीय सायनाने आपली गुणसंख्या ७५,३६९वर नेली. महिला एकेरीतील अन्य भारतीयांमध्ये पी. व्ही. सिंधू दहाव्या स्थानी कायम आहे. पुरुष एकेरीतील ताज्या क्रमवारीत श्रीकांत ११व्या स्थानी आहेत. त्याने २५,०८६ गुण मिळवलेत.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सहभागी न होता सरावाला प्राधान्य देणा-या अजय जयरामचे रँकिंग चार स्थानांनी घसरले आहे. ताज्या क्रमवारीत तो २४व्या स्थानी आहे. दुखापतीतून सावरणारा एच. एस. प्रणॉय २८व्या स्थानी आहे. त्याचे रँकिंगही चार स्थानांनी घसरले.
पुरुष दुहेरीत मनु अत्री आणि बी. सुमीथ रेड्डी जोडीची घसरण झाली. ताज्या क्रमवारीत ते २१व्या स्थानी आहेत. महिला दुहेरीत ज्वाला गुट्टा आणि अश्विनी पोनप्पाचेही रँकिंग घसरले. ही जोडी १६व्या स्थानी आहे.