अंधेरी येथील एम. व्ही. एम. कनिष्ट महाविद्यालयाच्या इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी पुष्पोत्सवातून नुकतीच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे विविध रंगीबेरंगी फुलांनी दर्शन घडवणारी महाराष्ट्राची लोकधारा साकार केली.
मुंबई- अंधेरी येथील एम. व्ही. एम. कनिष्ट महाविद्यालयाच्या इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी पुष्पोत्सवातून नुकतीच महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरेचे विविध रंगीबेरंगी फुलांनी दर्शन घडवणारी महाराष्ट्राची लोकधारा साकार केली. येथील कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य शांतिलाल शाह यांच्या संकल्पनेतून गेली सात वर्षे विविध विषय घेऊन येथील विद्यार्थी दरवर्षी पुष्पोत्सव साजरा करतात.
सध्याच्या सोशल मीडियाच्या, स्मार्ट फोनच्या आणि सेल्फिच्या युगात आपण कोणत्याही जातीधर्माचे असा, परंतु ज्या महाराष्ट्रात आपण राहतो त्या महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा आणि संस्कृतीचे जतन करण्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये वृद्धिगत होण्यासाठी यंदा महाराष्ट्राची लोकधारा हा विषय निवडला होता अशी माहिती प्राचार्य शाह यांनी दिली.
येथील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी दादर येथील फूल बाजारातून पहाटे ५ वाजता विविध प्रकारची फुले स्व:खर्चाने खरेदी करून आपल्या कल्पकतेमधून हा पुष्पोत्सव प्रभावीपणे साकारला. येथील एकूण ३७ संघांनी या पुष्पोत्सवात भाग घेतला.
३७ संघांमधील इयत्ता ११ वी आणि १२ वीच्या एकूण पहिल्या, दुस-या आणि तिस-या अशा दोन गटांमधील ६ विजेत्या संघाला यावेळी रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले. या पुष्पोत्सवाचे ज्येष्ठ पत्रकार तुळशीदास भोईटे यांनी दीपप्रज्वलन करून उद्घाटन केले. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम विभागाचे शिक्षण निरीक्षक नितीन बच्छाव होते. तर एम.व्ही.एम.शिक्षण संस्थेचे संचालक पी. एन. सुवर्णा, जी. के. रमेश, पत्रकार मनोहर कुंभेजकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. परीक्षक म्हणून ‘दै. प्रहार’च्या ज्येष्ठ पत्रकार निलिमा जांगडा आणि पत्रकार मनीषा म्हात्रे यांनी काम पाहिले.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक, गुढीपाडवा, पैठणी, कोळी नृत्य, कोल्हापुरी चप्पल, महाराष्ट्र पोलीस ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा पुष्पोत्सवातून साकार केल्याबद्दल मान्यवरांनी आपल्या भाषणात येथील विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्य शांतिलाल शाह यांच्या कल्पकतेचे आणि यशस्वी आयोजनाबद्दल कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ट महाविद्यालयाच्या संगणक प्राध्यापिका माधुरी नायक यांनी केले. तर रोहिणी तिवारी यांनी आभार मानले. सदर पुष्पोत्सव यशस्वीपणे साकारण्यासाठी प्राध्यापिका दर्शना सावंत, प्रिया मित्रा, अंकिता गोहिल, प्रणव पांचाळ, स्वाती देशमुख, शैलेश पाटील, हरप्रीत काँर यांनी मोलाचे सहकार्य केले.