सौंदर्यात भर घालणा-या दागिन्यांमध्ये जसे नथ, नेकलेस, पैंजण, बिंदी, मंगळसूत्र येते, त्याचप्रमाणे अंगठीदेखील हाताचे सौंदर्य खुलविणारी ठरते. हिरे, माणिक, मोती किंवा प्लेन सोन्याच्या अंगठीमध्ये विशिष्ठ रंगाचे खडे सजवून अंगठी साकारली जाते. विशेषत: साखरपुडा, विवाह समारंभात असणारे अंगठीचे महत्त्व हे विशेष मानले जाते.
यावेळी वधू-वरांची अंगठी विशेष आकर्षक आणि किमती स्वरूपाची असते. अंगठी सोने, चांदी, किंवा पंचधातूमध्येही साकारली जाते. प्रत्येकाच्या आवडीनुसार हातात घालण्यात येणारी अंगठी ही सोहळे, समारंभ किंवा नियमित हातामध्येही अनामिका, करंगळीमध्ये साकारली जाते.
बाजारात मिळणा-या साध्या मॅचिंगच्या अंगठय़ाही हौसेखातर तरुणींमध्ये विशेष लोकप्रिय ठरतात. आवडीनुसार गोल, चौकोनी किंवा केवळ खडय़ाच्या अंगठय़ाही बोटांमध्ये घातल्या जातात. तसेच विशिष्ट डिझाईनच्या अंगठय़ा आपापल्या पसंतीनुसार कारागिरांकडून बनवून घेऊन बोटांचे सौंदर्य खुलविले जाते.