भारताचा सलग तिसरा विजय, पराभवानंतरही पाकिस्तान ‘सुपर फोर’मध्ये
ढाका – आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या गटवार साखळीमध्ये रविवारी फॉर्मात असलेल्या भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ३-१ अशी मात केली. सलग तिस-या विजयासह भारताने ‘अ’ गटात अव्वल स्थान राखले. मात्र पराभवानंतरही पाकिस्तानने पुढील फेरी गाठली. जपानने बांगलादेशला ३-१ असे हरवले तरी गोलफरकाच्या जोरावर पाकिस्तान सरस ठरला.
भारत आणि पाकिस्तान या ‘हाय प्रोफाईल’ लढतीकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. मात्र भारताने प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व राखले. चिंग्लेन्सना सिंग, रमणदीप सिंग आणि हरमनप्रीत सिंगने प्रत्येकी एक गोल करत विजयात मोलाचे योगदान दिले. पाकिस्तानतर्फे एकमेव गोल अली शानने केला. पहिल्या क्वार्टरमध्ये गोलफलक कोराच राहिला. १७ व्या मिनिटाला चिंग्लेन्सनाने भारताचे खाते उघडले. त्याच्या बळावर माजी विजेत्यांनी मध्यंतराला १-० अशी आघाडी राखली. तिस-या क्वार्टरमध्ये दोन गोल करत भारताने आघाडी वाढवली.
क्वार्टर संपायला एक मिनिट शिल्लक असताना दोन गोल करण्यात रमणदीप आणि हरमनप्रीतला यश आले. पाकिस्तानला पहिला गोल करण्यासाठी चौथ्या क्वार्टरची वाट पाहावी लागली. ४९व्या मिनिटाला अली शानने तो गोल केला. लंडनमध्ये झालेल्या हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेनंतर आशिया चषकातही सवरेत्कृष्ट खेळ करत भारताने पाकिस्तानवर वर्चस्व राखले. सलग तिस-या विजयासह नऊ गुणांनिशी भारताने ‘अ’ गटात अव्वल स्थान राखले. भारताचा ‘सुपर फोर’ संघांतील प्रवेश आधीच निश्चित झाला होता. मात्र अव्वल स्थानामुळे ‘नॉकआउट फेरी’मध्ये तुलनेत सोपा ‘ड्रॉ’ असेल.
भारताविरुद्धच्या पराभवानंतरही पाकिस्तानची आगेकूच कायम राहिली आहे. तीन सामन्यांतून त्यांचे चार गुण झाले. पहिल्या लढतीत यजमान बांगलादेशवर ३-१ असा विजय मिळवत जपाननेही गुणसंख्या चारवर पोहोचवली. मात्र गोलफरकाच्या जोरावर पाकिस्तानचा पुढील फेरीतील प्रवेश सुकर झाला. पाकिस्तानने दहा गोल करताना पाच गोल खाल्लेत. त्यामुळे त्यांचा गोलफरक अधिक पाच आहे. याउलट सहा गोल चढवत आठ गोल खाणा-या जपानचा गोलफरक वजा दोन असा आहे. भारताविरुद्धच्या मोठय़ा पराभवामुळे जपानला गटवार साखळीत बाहेर पडण्याची वेळ आली आहे.
‘अ’ गटातून भारत आणि पाकिस्तानने अव्वल चार संघांमध्ये स्थान मिळवले. ‘ब’ गटातून मलेशियाने आगेकूच केली. दुस-या स्थानासाठी दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये चुरस आहे. मलेशियाने (६ गुण) सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकलेत. दक्षिण कोरिया आणि चीनने दुबळय़ा ओमानला हरवत प्रत्येकी तीन गुण मिळवले आहेत. मात्र मलेशियाविरुद्ध काहीच चालले नाही. गटवार साखळीतील शेवटच्या लढतीत चीन आणि दक्षिण कोरिया आमनेसामने आहेत. यातील विजेता पुढील फेरी गाठेल. अन्य लढतीत मलेशियाची गाठ ओमानशी पडेल. या लढतीत अव्वल स्थानी असलेल्या मलेशियाला आणखी एका विजयाची
संधी आहे.