पाकिस्तानचा कुख्यात हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अजीज हक्कानी याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
वॉशिंग्टन- पाकिस्तानचा कुख्यात हक्कानी नेटवर्क या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अब्दुल अजीज हक्कानी याला अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ले घडवून आणल्याचा आरोप हक्कानीवर ठेवण्यात आला आहे.
हक्कानी नेटवर्क अफगाणिस्तान आणि भारताविरोधी दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी कुप्रसिध्द आहे. बदरुद्दीन हक्कानी याच्या मृत्युनंतर अजीज हा ‘हक्कानी नेटवर्क’चा म्होरक्या बनला आहे. हक्कानी नेटवर्कचा दहशतवादी सिराजुद्दीन हक्कानी याचा तो भाऊ आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये अमेरिकेने अजीजची माहिती देणा-याला ५० लाख डॉलर बक्षिसाची घोषणा केली होती.
अफगाणिस्तानात २००८ मध्ये काबूल येथे झालेल्या हल्ल्यात ५८ जण ठार झाले होते. या हल्ल्यातही हक्कानी नेटवर्कचा हात होता. यावर्षी जून महिन्यात अफगाणिस्तानमधील भारतीय दुतावासातील झालेल्या हल्ल्यासंबंधी हक्कानी नेटवर्कच्या काही दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. या हल्ल्यात चार भारतीयांसह १४ जण ठार झाले होते.