‘सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन लॅबॉरेटरी’चा सर्वसामान्यांना लाभ, तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारीवर्गाकडून आजारांचे निदान क्षणात; कोकणवासीय समाधानी
कोकणातील जनतेचे आरोग्य सुजलाम् सुफलाम् राहण्यासाठी सुमारे दहा वर्षापूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायणराव राणे यांनी सर्व सोयींनी युक्त असे सुसज्ज रुग्णालय सिंधुदुर्गात उभारावे अशी संकल्पना मनात आणली होती. त्यांनी ती सत्यात उतरविली आणि सिंधुदुर्गातील गरीब जनतेचा वेळ आणि पैसा वाचविला. गोवा, बेळगाव, कोल्हापूर आणि मुंबईसारख्या महागडय़ा शहरात जाऊन गंभीर आजारांवर उपचारासाठी जाण्यापेक्षा आता कसाल पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये माफक दरात उपचार दिले जात आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील ओरोस सिंधुदुर्गनगरीनजीक पडवे या छोटेखानी गावात हे लाईफटाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारले आहे. शेकडो एकर जमीन क्षेत्रातील या हॉस्पिटलचा परिसर पाहून मन आनंदित होते. निसर्गरम्य परिसरातील गर्द हिरवाईतील या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये जर एखादा रुग्ण आल्यास तो तेथील रमणीय वातावरण पाहूनच अर्धा बरा व्हावा, अशा तऱ्हेची रचनाच या हॉस्पिटलची करण्यात आली आहे. सिंधुदुर्गात अनेक अपघात होतात. त्यातील गंभीर जखमीला गोवा, बेळगाव किंवा कोल्हापूर येथे उपचारासाठी हलवावे लागते. तेथील हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास किमान तीन ते चार तास लागत असत आणि तिथे गेल्यानंतर तेथे उपचार वेळीच होतीलच याची शक्यता आणि शाश्वती नसल्याने रुग्णाचे नातेवाईकही आणखीनच त्रस्त होत असत. अशा परिस्थितीत वेळ चांगली असली, तर रुग्ण वाचत असे. रुग्ण वेळीच हॉस्पिटलमध्ये पोहोचला असता, तर वाचवू शकलो असतो, असे विधान ऐकू यायचे; परंतु आता तसे नाही. काही कालावधीतच आपण लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये पोहोचून अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या आधारे आपण उपचार घेऊ शकतो.
यासाठीच विविध आजारांचे निदान आणि त्यावर उपचार करण्यासाठी इम्पोर्टेड मशीन्स उपलब्ध करण्यात आल्या. कुशल तंत्रज्ञांचीही नेमणूक झाली. रुग्णाला काही क्षणातच आजाराचे निदान कळू लागले आहे. मुंबई, पुणे, मिरज, कोल्हापूर, गोवा येथे जाणेही आता टळले आहे. गेल्या दोन वर्षात सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यात माकडतापाने तेथील जनता हैराण झाली. कित्येक जणांचे बळी गेले. या आनुषंगाने माकडतापावर जलद उपचार व्हावा यासाठी खा. नारायण राणे यांनी इम्युनॉलॉजी लॅबसारख्या माकडताप साथीच्या आजारांची तपासणी करण्यासाठी नवीन यंत्र उपलब्ध करून दिले आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर, लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन (आतडे), स्टमक (जठर) आदी आजारांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया लेप्रोस्कोपी (दुर्बीण) द्वारे होणार आहेत. त्यासाठी अत्याधुनिक आणि पूर्णत: ऑटोमेटिक अशा जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड या देशातील मशिनरी येथे आणून बसविण्यात आल्या आहेत. पित्ताशयातील खडे, पित्ताशयाची पिशवी काढणे, अपेंडिक्स, हर्निया ऑपरेशन करून त्या ठिकाणी जाळी बसविणे, फुटलेल्या अल्सरची शस्त्रक्रिया, किडनीच्या आजारातील सर्व शस्त्रक्रिया, मोठय़ा व लहान आतडय़ातील कॅन्सरचे निदान व गाठी काढणे, स्वादूपिंड शस्त्रक्रिया, लिव्हर ऑपरेशन आदी अनेक आजार बरे करण्यात येत आहेत.
खा. नारायण राणे यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक मशिनरींच्या साह्याने सर्वच रोगांची तपासणी व निदान होत आहे. सर्वच आजारांच्या तपासण्या पूर्णत: अॅटोमॅटिक मशिनरीच्या साह्याने करण्यासाठी ‘लाईफटाईम हॉस्पिटल’मध्ये सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन लॅबोरेटरी सुरू करण्यात आली. या लॅबोरेटरीमध्ये चार बायोकेमिस्ट्री डॉक्टर्स व तीन पॅथॉलॉजी डॉक्टर्स आणि दोन मायक्रो बायोलॉजी डॉक्टर्स अशा नऊ तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्यात आली आहे. या लॅबोरेटरीमध्ये बायोकेमिस्ट्री अॅनालायझर, हार्मोन्स अॅनालायझर, इलेक्ट्रोलाईट अॅनालायझर, आर्टेरियल ब्लड गॅस अॅनालायझर, ग्लॅक्टेड हिमोग्लोबिन, ब्लड सेल काऊंटर आदी अत्याधुनिक आणि पूर्णत: ऑटोमॅटिक मशिनरी बसविण्यात आल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्वच आजारांचे निदान व तपासण्या होणार आहेत. रक्तातील रक्तद्रव्य, तांबडय़ा पेशी व पांढ-या पेशींची संख्या व प्रमाण तपासणी, रक्तातील जंतूंचे पृथक्करण करणे, व्हीडीआरएल, एचआयव्ही (एड्स तपासणी) स्तनांच्या कॅन्सरची तपासणी करण्यासाठी मेमोग्राफी टेस्ट व क्लिनिकल ब्रेस्ट चेकअप, टेस्टिक्युलर बायोप्सी, व्हसरेग्राफी, पुरुष व स्त्री वंधत्व निदान, गर्भाशय कॅन्सर, ब्लड कॅन्सर, हार्मोन्स टेस्ट, ब्लड गॅस तपासणी, लिव्हर फंक्शन, कावीळ, यकृत दाह तपासणी आणि निदान, प्लेटलेट, हार्टच्या सर्व चाचण्या, सायटॉलॉजीज लॅब, इम्युनॉलॉजी लॅब (माकडतापासारख्या साथीच्या आजारांची तपासणी), तसेच मायक्रॉलॉजी लॅब (फंगस तपासणी), पिस्टो पॅथॉलॉजी (गाठी, टय़ूमर तपासणी), व्हायरॉलॉजी लॅबोरेटरी असून तिथे सर्व प्रकारच्या आजारांच्या तपासण्या व निदान होत आहे. विशेष म्हणजे या लॅबोरेटरीमध्ये तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांसाठी अहोरात्र उपलब्ध असल्याचे हॉस्पिटल प्रशासनातर्फे सांगण्यात आले. मेडिकल कौन्सिलची परवानगी मिळताच क्षणी मेडिकल कॉलेजचीही सुरुवात करण्यात येणार आहे.