बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील चार डॉक्टरांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
अहमदनगर- जिल्हा परिषदेतील बोगस अपंग प्रमाणपत्र प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या महेश बारगजे व संतोष लष्करे या दोन दलालांच्या चौकशीत या प्रकरणात जिल्हा सरकारी रुग्णालयातील चार डॉक्टरांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. डॉ. किसन गोल्हार, डॉ. अंबादास ससे, डॉ. श्रीकांत पाठक आणि डॉ. पोपट सोनवणे, अशी चार डॉक्टरांची नावे आहेत.
या डॉक्टरांनी १० ते १५ हजार रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.
जिल्हा परिषदेत शिक्षकांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे सादर केल्यानंतर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या वेळी पोलिसांनी जिल्हा सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांची चौकशी केली होती. मात्र, चौकशीत फारसे काही हाती न लागल्याने डॉक्टरांवर कारवाई होऊ शकली नव्हती. मात्र, आता चार डॉक्टरांची नावे उघड झाल्याने पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
जिल्हा परिषदेत बदली टाळण्यासाठी प्राथमिक शिक्षकांनी अपंग असल्याची चक्क बनावट प्रमाणपत्रे मिळवून जिल्हा परिषदेकडे सादर केली होती. मात्र, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ब-याच वेळेनंतर सामाजिक संघटनांचा दबाव तसेच सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गेंटयाल यांनी ७६ शिक्षकांच्या विरुद्ध न्यायालयात खासगी तक्रार दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेने ७६ शिक्षकांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.