अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे उत्तर भारतासह पाकिस्तानही हादरले असून पाकिस्तानातील मृतांचा आकडा १०० वर पोहचला आहे. तर अफगाणिस्तानात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ शालेय विद्यार्थीनींचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली- अफगाणिस्तानमधील भूकंपामुळे उत्तर भारतासह पाकिस्तानही हादरले असून पाकिस्तानातील मृतांचा आकडा १०० वर पोहचला आहे. तर अफगाणिस्तानात झालेल्या चेंगराचेंगरीत १२ शालेय विद्यार्थीनींचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अफगाणिस्तानमधील हिंदूकूश पर्वत रांगांमध्ये सोमवारी दुपारी ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे धक्के राजधानी नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारत आणि पाकिस्तानमध्येही बसले आहेत. हिंदूकूश हे भूकंपाचे केंद्रबिंदू आहे.
या भूकंपात ११४ जण ठार झाले असून २०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानात या भूकंपाने १०० जणांचे बळी घेतले असून अफगाणिस्तानात १४ जण ठार झाले आहेत. भारतात जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपानंतर भारताने अफगाणिस्तान, पाकिस्तानला मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
अफगाणिस्तानच्या हिंदुकूश पर्वतराजीत दुपारी २ वाजण्याच्या सुमारास भूकंप झाला. तेथे या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाचे धक्के भारतात जम्मू-काश्मीर, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानमध्ये बसले. या धक्क्यानंतर नागरिक व ऑफिस कर्मचा-यांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. दिल्लीतील मेट्रो सेवाही तातडीने थांबवली. श्रीनगरच्या रहिवाशांनी सांगितले की, भूकंपाच्या धक्क्याने इमारती हलत असल्याचे दिसत होते.
काश्मीरात दोन लष्करी जवान जखमी
भूकंपाच्या धक्क्यानंतर काश्मीरच्या सोपोर येथे बंकर कोसळून लष्कराचे दोन जवान जखमी झाले. गांजू हाऊस येथे लष्कराच्या तळ आहे. तेथे बंकर कोसळून ही दुर्घटना घडली. त्याचबरोबर जहॉँगीर चौक येथील पुलांना तडे गेले आहेत. या भूकंपामुळे काश्मीरातील दूरसंपर्क यंत्रणा कोलमडली आहे. या भूकंपामुळे घराघरातील खुच्र्या, पंखे, बिछाने मोडले आहेत.
पंजाबमध्येही परिणाम
पंजाबच्या अमृतसर, फगवाडा, जालंधर, पटियाळा, फरिदाकोट, गुरुदासपूर, लुधियाना व मोहाली येथे भूकंपाचे धक्के जाणवले. कुत्रे व पक्षी चित्रविचीत्र पद्धतीने वागत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.
पाकिस्तानात १०० ठार
पाकिस्तानला या भूकंपाचा मोठा फटका बसला असून तेथे १०० ठार तर २०० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू काबूलपासून २५० किलोमीटरवरील जुर्म येथे होता. या भूकंपाची खोली २१३.५ किलोमीटर होती, अशी माहिती अमेरिकेच्या भूगर्भ खात्याने दिली. कराची, लाहोर, इस्लामाबाद, क्वेटा, कोहाट, पेशावर, बाजौर, कल्लर कहार, पाकव्याप्त काश्मीर, चित्राल, गिलगीट बाल्टीस्थान येथे भूकंपाचे बळी गेले. डोंगराळ भागातील अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून त्यात अनेकजण अडकले असण्याची शक्यता आहे. एकटय़ा स्वाट भागात १९४ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अफगाणिस्तान १२ मुलींसह १८ जण ठार
काबूल : अफगाणिस्तानातील तालुकान शहरात भूकंपाने हाहाकार माजवला आहे. या भूकंपात १८ जण ठार व ३५ जण जखमी झाले आहेत.
मृतांमध्ये १२ मुलींचा समावेश आहे. तालुकान शहरात भूकंपाचे धक्के बसल्यानंतर शाळेतील विद्यार्थी बाहेर पडत असताना चेंगराचेंगरी होऊन त्यात १२ मुलींचा मृत्यू झाला, तखार शिक्षण विभागाचे प्रमुख इनायत नावीद यांनी सांगितले. नानगरहार प्रांतातील काही जिल्ह्यात अनेक नागरिक दरडीखाली अडकल्याची शक्यता आहे.