अमेरिकेने इराकमधील ‘इसिस’च्या ताब्यात असलेल्या प्रदेशावर हवाई हल्ले सुरु केले आहेत.
वॉशिंग्टन-इराकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून ‘इसीस’च्या दहशतवाद्यांकडून सुरू असलेला हिंसाचार कमी होत नाही. त्यामुळे इराकमधील दहशतवाद्यांवर हवाई हल्ले करण्याचे आदेश अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दिले होते, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
ओबामा म्हणाले की, इराकमध्ये निरपराध अल्पसंख्याकांचा बळी जाताना आम्ही गप्प राहू शकत नाही. मात्र, इराकमध्ये आम्ही पायदळ उतरवणार नाही. कुर्दस्तानची राजधानी इरबिलकडे ‘इसीस’चे दहशतवादी कूच करीत आहेत. त्यामुळे या दहशतवाद्यांना रोखणे गरजेचे आहे. या कुर्दस्तानमध्ये ख्रिश्चन आणि येझिदी अल्पसंख्याकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. या डोंगराळ भागात अन्न आणि पाण्याशिवाय हजारो लोक जगत आहेत. नागरिकांचे कुपोषण होत असून लहान मुले पाण्याशिवाय मरत आहेत. या भागातील येझिदी वंशाचा दहशतवादी नाश करीत आहेत, अशी भूमिका ओबामा यांनी मांडली.
दरम्यान, पेंटागॉनने एक ‘सी-१७’ आणि दोन ‘सी-१३०’ विमाने अन्न व पाणी घेऊन पाठवली आहेत. कुर्दिस्तान भागात ते अन्न व पाणी टाकणार आहेत. या विमानांना एफ/ए-१८ विमानांचे संरक्षण देण्यात येणार आहे.