ध्रुवीय वा-यांच्या तडाख्यातून सावरत असतानाच अमेरिकेला पुन्हा जोरदार हिम वादळाचा तडाखा बसला आहे.
वॉशिंग्टन- ध्रुवीय वा-यांच्या तडाख्यातून सावरत असतानाच अमेरिकेला पुन्हा जोरदार हिम वादळाचा तडाखा बसला आहे. अमेरिकेच्या विविध शहरातील तापमान उणे १० ते २५ अंशापर्यंत घसरले आहे. ठिकठिकाणी रस्ते वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. तब्बल तीन हजाराहून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत.
हाडे गोठवणा-या थंडीमुळे विविध शहरातील शाळा व कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. शिकागो शहरातील तापमान उणे २८ अंशावर उतरले आहे. न्यूयॉर्क शहरात बर्फाचा १४ इंच थर साचला आहे. शहराचे महापौर बिल डी ब्लासिओ यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.
राजधानी वॉशिंग्टनमध्ये बर्फाचे साम्राज्य पसरले असून कर्मचा-यांना घरातूनच काम करण्याचे आवाहन सरकारने केले. शहरातील रेस्टॉरंट ओस पडल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत.
अटलांटिक महासागरातून येणारे हिम वादळ अधिक तीव्र होत आहे. यामुळे पूर्व किनारपट्टीवरील विविध शहरातील तापमान गोठणबिंदू खाली गेले, असे राष्ट्रीय हवामान सेवेने म्हटले आहे.