तासगाव तालुक्यातील धामणी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला.
तासगाव- तासगाव तालुक्यातील धामणी गावामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात आला. मुलीचा विरोध असतांना हा बालविवाह शुक्रवारी करण्याचे आयोजले होते.
धामणी गावामध्ये एका गणेश मंदिरात हा विवाह होणार होता. या विवाहाला मुलीचा विरोध होता. तिचा विरोध डावलून हा विवाह होणार होता. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती मिळाली होती.
या सामाजिक कार्यकर्त्यांनी वकिल अमित शिंदे आणि पत्रकार सुनील गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्याशी संपर्क साधला.
पिंगळे यांना माहिती मिळताच त्यांनी धामणी गावामध्ये उपनिरिक्षक प्रविण शिंदे, खाडे यांच्यासह घटनास्थळी पोलिसांना पाचारण केले. संपूर्ण घटनेची माहीती घेतली आणि हा विवाह थांबवला.
१८ वर्षानंतरच मुलीचे लग्न करण्याची आई वडिलांची लेखी हमी घेतली. त्यामुळे त्या मुलीचा बालविवाह रोखला गेला.
बालविवाहाची माहिती देणा-या सामाजिक कार्यकर्त्यांसह डॉ. विवेक गुरव व बालविवाह रोखण्यासाठी जलदगतीने पावले उचलणा-या तासगाव पोलिसांमुळे हा बालविवाह रोखल्याने त्यांचे कौतुक होत आहे.