गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावलेल्या डबल डेकरकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने चाचणी यशस्वी झाली तरी ती कायमस्वरूपी या मार्गावर धावेल का, याची रेल्वेला असलेला चिंता आता संपल्यात जमा आहे.
रत्नागिरी- गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावलेल्या डबल डेकरकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने चाचणी यशस्वी झाली तरी ती कायमस्वरूपी या मार्गावर धावेल का, याची रेल्वेला असलेला चिंता आता संपल्यात जमा आहे. प्रीमियम दर रद्द करून २ ऑक्टोबरपासून डबल डेकर पुन्हा कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहे. आधी चालेल की नाही, अशी शंका असलेली ही गाडी २ ऑक्टोबरला हाउसफूल धावणार आहे.
डायनॅमिक प्रायसिंग पद्धतीची तिकीट आकारणी आणि चुकीचे धोरण यामुळे गणेशोत्सवात खर्चही भागवू शकेल, इतकेही उत्पन्न मिळवू शकली नाही. त्यामुळेच डबल डेकर आणि याच कालावधीत धावलेली शताब्दी एक्स्प्रेस या गाडया रेल्वेसाठी ‘पांढरे हत्ती’ ठरले होते. मात्र, ही चूक सुधारत रेल्वेने आधी १६ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबपर्यंत दिवाळीसाठी आणि त्यापाठोपाठ २ आणि ५ ऑक्टोबरसाठी ‘विकेंड स्पेशल’ डबल डेकर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यातील २ आणि ५ आक्टोबरच्या फे-यांबाबत रेल्वेचे नियोजन अचूक ठरले आहे. गुरुवारी २ ऑक्टोबरला लो. टिळक टर्मिनस ते करमळीपर्यंत धावणा-या डबल डेकरचे आरक्षण २७ रोजी खुले झाले आणि अवघ्या तीनच दिवसात ९६० प्रवासी क्षमतेची ही गाडी पूर्ण भरली असून प्रतीक्षा यादीवर ५२ तिकिटे विकली गेली आहे. ५ ऑक्टोबरच्या या गाडीच्या परतीच्या प्रवासातही ही गाडी हाउसफूल धावणार आहे. मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत ५ आक्टोबरची ९६० पैकी केवळ १२३ तिकिटे शिल्लक राहिली होती. आरक्षणासाठी अजून चार दिवसांचा अवधी असल्याने गाडीच्या या दिवशीचे आरक्षणही वेटिंगवर जाऊ शकते.
आरक्षणाची हीच स्थिती २६ ऑक्टोबरच्या फेरीची असून तिचेही आरक्षण वेटिंगवर गेले आहे.
२६ आक्टोबरच्या लो. टिळक टर्मिनस-करमळी डबल डेकरसाठी गाडीच्या क्षमतेपेक्षाही अधिक आरक्षण झाल्यामुळे मंगळवारअखेर प्रतीक्षा यादीवर २० जागांचे आरक्षण झाले आहे. १६ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीत दिवसआड डबल डेकर लो. टिळक टर्मिनस-करमळी मार्गावर तर करमळी-लो. टिळक टर्मिनस मार्गावर ही गाडी १७ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर या कालावधीत दिवसआड धावणार आहे. पहाटे ५.३० वाजता लो. टिळक टर्मिनसहून सुटलेली ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी थीवीम थांबे घेत सायंकाळी ४ वाजता करमळीला पोहोचणार आहे.
नोव्हेंबरनंतर डबल डेकर नियमित?
कोकण रेल्वे मार्गवर प्रवाशांसाठी अत्यंत पसंतीची ठरलेली जनशताब्दी एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून मडगावच्या आधी करमळी स्थानकापर्यंतच धावणार आहे. दरम्यान, गेल्या १२ वर्षापासून मुंबईतून मडगावपर्यंत धावणारी जनशताब्दी अचानक करमळी स्थानकापर्यंत जाहीर करण्यात आला आहे. खात्रीशीर माहितीनुसार डबल डेकरला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ती मडगावपर्यंत नेण्याचा रेल्वेचा विचार आहे. यासाठीच जनशताब्दीचा प्रवास करमळी स्थानकावर संपणार आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी डबल डेकरला प्रवाशांचा प्रतिसाद लाभला तर आम्ही ती कायम करू, असे सांगितले होते. डबल डेकरचे प्रीमियम दर रद्द केल्यानंतर तिला मिळणार प्रतिसाद पाहता नोव्हेंबरनंतर तिचा मडगावपर्यंत नियमित धावण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजते.