म्हाडाच्या घरांची यापुढची सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार असून ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे त्यांनाचं लॉटरीसाठी अर्ज करता येणार आहे.
मुंबई – म्हाडाच्या घरांची यापुढची सोडत लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र ज्यांच्याकडे आधारकार्ड आहे, त्यांनाच या योजनेचा फायदा देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. मात्र आतापर्यंत मुंबईत फक्त ३५ टक्केच आधारकार्ड वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे आधारकार्ड नसलेल्या गरजू मुंबईकरांना म्हाडाच्या घरांपासून मुकावे लागणार आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या काढण्यात येणा-या पुढील सोडतीसाठी आधारकार्ड बंधनकारक करण्याचा निर्णय सोमवारी म्हाडा अधिका-यांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. येत्या काही दिवसांत होणा-या प्राधिकारणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे. दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी पात्र असणा-यांकडून अर्ज मागवण्यात येतात. अर्जदारांनी या अर्जामध्ये आधारकार्डची माहिती भरणे बंधनकारक करण्यात येणार आहे. सोमवारी झालेल्या बैठकीत म्हाडाचे कार्यकारी अधिकारी सतीश गवई यांनी पुढील लॉटरीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या. यापूर्वी काढण्यात आलेल्या सोडतींसाठी अर्जदारांना पॅनकार्ड बंधनकारक होते. या निर्णयामुळे म्हाडाच्या अधिका-यांना कागदपत्रांची पूर्तता करणे सोयीचे ठरणार आहे. मात्र आधारकार्ड योजना अद्याप संथगतीने सुरू असल्याने आधारकार्ड नसलेल्यांना घरांपासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र जनतेने आधारकार्ड घ्यावे यासाठी म्हाडाच्या वतीने जनजागृती करण्याचा विशेष प्रयत्न करणार असल्याचे एका अधिका-याने सांगितले.