राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणा-या आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.
गेल्या काही दिवासांपासून ‘आप’ने राज्यातील वीज खात्यातील भ्रष्टाचारावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांना लक्ष्य करत आहेत. यावरून अंधेरी येथील चकाला परिसरात असणा-या ‘आप’च्या कार्यालयावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला बोल केला. या हल्ल्यात ‘आप’च्या कार्यालयातील सामानाची तोडफोड करण्यात आली. तसेच कार्यालयातील पक्षाचे नेते आणि दिल्लीचा माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे छायाचित्र फाडण्यात आली आहेत.
दुपारी अडीचच्या सुमारास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ‘आप’च्या कार्यालयावर हल्ला केला. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असून पुरावा म्हणून सीसीटीव्हीचे फुटेज देणार असल्याचे आपचे नेते परितोष यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे.
या हल्ल्यानंतर ‘आप’चे नेते मयांक गांधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडे आंदोलनासाठी जाताना त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
‘आप’च्या राज्यातील प्रभारी अंजली दमानिया यांनी महावितरण आणि महाजनकोमध्ये २२ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले होते.