आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली आहे. आप एक नेता असलेली खाप पंचायत बनली आहे.
नवी दिल्ली – आम आदमी पक्षातून हकालपट्टी झालेले प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर सडकून टीका केली आहे. आप एक नेता असलेली खाप पंचायत बनली आहे.
आपमध्ये हुकूमशहा असून, सर्वांना त्याचे म्हणणे ऐकावे लागते. या एका नेत्यासाठी आपचे अन्य नेते वाट्टेल ते करु शकतात अशा शब्दात प्रशांत भूषण यांनी अरविंद केजरीवाल यांच्या कारभारावर टिका केली.
पक्षाचे संस्थापक सदस्य असणारे प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, आनंद कुमार आणि अजित झा यांच्यावर पक्ष विरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सोमवारी रात्री उशिरा त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
मंगळवारी सकाळी भूषण यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या माजी सहका-यांवर जोरदार शाब्दीक हल्ला चढवला. ज्यांनी आम्हाला पक्षाबाहेर काढले त्यांच्यावर गंभीर आरोप आहेत. आपचा आत्मा, संविधानाची जे पायामल्ली करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आमच्यावर कारवाई केली. आपमध्ये जे सुरु आहे त्याने आम्ही निराश आहोत असे भूषण म्हणाले.