आयएनएस कोलकाता युद्धनौकेला शुक्रवारी माझगाव गोदीत झालेल्या अपघातात एका नौदल अधिका-याचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली– नौदलाच्या जहाजांना होणा-या अपघातांच्या मालिकेत शुक्रवारी आणखी एका अपघाताची भर पडली. नौदलामध्ये अद्याप कार्यान्वित न झालेल्या युद्धनौकेवर वायूगळतीनंतर स्फोट होऊन एका नौदल अधिका-याचा मृत्यू झाला तर काही कर्मचारी जखमी झाले.
माझगाव गोदीमध्ये आयएनएस कोलकाता श्रेणीतील ‘यार्ड-७०१’ या विनाशिकेची बांधणी सुरू असून तिच्या काही चाचण्या घेतल्या जात होत्या. या चाचण्यांच्या वेळी नौकेवरील कार्बन डायॉक्साइड युनिटमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर तेथून वायूगळती सुरू झाली. वायूगळतीनंतर कार्बनडायॉक्साइड वायूच्या सिलेंडरवर असलेला व्हाल्व फुटून तो नौकेवरील अधिका-याच्या छातीवर आदळला आणि त्यात त्या अधिका-याचा मृत्यू झाला.
आयएनएस कोलकाता ही भारतीय नौदलाच्या ताफ्यातील सर्वात आधुनिक विनाशिका असून काही आठवड्यातच तिचे जलावतरण केले जाणार आहे. सध्या मुंबई गोदीत असलेल्या या विनाशिकेच्या विविध चाचण्या सुरू आहेत.
भारताकडून बांधणी सुरू असलेल्या विनाशिकांच्या मालिकेतील आयएनएस कोची आणि आयएनएस चेन्नई या आणखी दोन युद्धनौका आहेत. काही दिवसांपूर्वीच सिंधुरत्न या पाणबुडीवर झालेल्या अपघातात दोन नौदल अधिका-यांचा मृत्यू झाल्यानंतर नौदलप्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता. मात्र, नौदलाचे अपघात सुरूच राहिल्यानंतर नौदलाच्या युद्धनौकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. नौदलाच्या जहाजांचा गेल्या एक वर्षातील हा अकरावा अपघात आहे.