माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात फूट पडली असून पक्षाच्या १३ आमदारांनी सत्ताधारी नितीशकुमार सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
पाटणा- माजी रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलात फूट पडली असून पक्षाच्या १३ आमदारांनी सत्ताधारी नितीशकुमार सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय सोमवारी घेतला.
१३ आमदारांपैकी पाच अल्पसंख्याक आमदारांची सोमवारी पक्षाचे आमदार सम्राट चौधरी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या वेळी आमदारांनी विधानसभा अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांना पत्र लिहून नितीशकुमार यांच्या सरकारला पाठिंबा देत असल्याचे कळवले. या वृत्ताला विधानसभा सचिव फूल झा यांनी दुजोरा दिला.
या आमदारांनी जदयू सरकारला पाठिंबा दिल्याने आता त्यांच्याकडे १२८ आमदार झाले आहेत. बिहारच्या २४३ जागा असलेल्या विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १२२ जणांची गरज आहे. त्यामुळे जदयूला आता पूर्ण बहुमत मिळाले आहे.
सहा आमदारांचे घूमजाव
पक्ष सोडल्याची घोषणा केलेल्या राजदच्या १३ आमदारांपैकी सहा आमदारांनी घूमजाव केले. वेगळा पक्ष स्थापन करण्यासाठी आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.