माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे स्मारक मुंबईतील मरिन लाईन्स येथे उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनात दिले होते.
नागपूर – माजी गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे स्मारक मुंबईतील मरिन लाईन्स येथे उभारण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील अधिवेशनात दिले होते. मात्र यावेळी त्यांनी आपल्या निर्णयावर कोलांटउडी घेत याबाबत विचारलेल्या प्रश्नोत्तरात खोटी माहिती दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य प्रकाश गजभिये यांनी केला आहे.
विधान परिषदेत प्रश्नोत्तरात राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे स्मारक मुंबईतील मरिन लाईन्स येथील पोलीस जिमखाना येथे उभारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे हे खरे आहे काय, असा प्रश्न प्रकाश गजभिये यांनी विचारला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे खरे नाही, असे लेखी उत्तर दिले.
मुळात अंतिम आठवडा प्रस्ताव म्हणून अशा प्रकारचा प्रस्ताव आपण मुख्यमंत्र्यांना सादर केला होता. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी होकार दाखवत आबांचे स्मारक मुंबईतच उभारले जाईल याबाबत अनुकूलता दर्शवली होती. तशी चर्चा आमच्या दोघांत झाली होती. शिवाय तसे आश्वासन मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिले होते. असे असताना आता मात्र चक्क पलटी मारू मुख्यमंत्र्यांनी तसे काहीही विचाराधीन नसल्याचे सांगत खोटी माहिती प्रश्नोत्तरात दिली असल्याचे प्रकाश गजभिये यांनी आरोप केला आहे. आपली मागणी पूर्ण न झाल्यास सरकारविरोधात आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.