अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा जामीन जोधपूर सत्र न्यायालयाने शनिवारी नाकारला.
जोधपूर- अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाप्रकरणी तुरुंगात असलेल्या स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापूचा जामीन जोधपूर सत्र न्यायालयाने शनिवारी नाकारला.
सप्टेंबर २०१३ पासून तुरुंगात असलेल्या आसाराम बापूने जामिनासाठी केलेली याचिका सहाव्यांदा न्यायालयाने फेटाळून लावली. आसाराम जामीन मिळवण्याच्या योग्यतेचा नसल्याचे मत नोंदवत अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश मनोज कुमार व्यास यांनी आसारामचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
आसारामच्या जामिनासाठी भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रयत्न केला. आसारामला या संपूर्ण प्रकरणात गोवण्यात आले आहे. ते जामिनासाठी पात्र आहेत, असे स्वामींचे म्हणणे होते. सरकारी वकील पी. सी. सोलंकी यांनी आसारामच्या जामीन अर्जाला विरोध केला.
न्यायालयाने निर्णयाप्रत येण्यापूर्वी पीडित मुलीचे वय आणि गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी, असा युक्तिवाद सोलंकी यांनी केला. सत्र न्यायालयाने यापूर्वी दोन वेळा आसारामचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. उच्च न्यायालय तसेच सर्वोच्च न्यायालयानेही आसारामला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.