दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी इस्त्राईलला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.
नवी दिल्ली- दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी इस्त्राईलला भेट देणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरणार आहेत. इस्त्राईल दौ-याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, मात्र या वर्षात मोदी इस्त्राईलला भेट देतील आणि त्यानंतर आपण इस्त्राईलसह पॅलेस्टाईन आणि जॉर्डन या देशांच्या दौ-यावर जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी सांगितले.
मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वराज यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची विकास कामे आणि घेतलेल्या निर्णयाचा आढावा सादर केला. यात भारतात होणा-या थेट परकी गुंतवणुकीमध्ये मागील वर्षभरात ३९ टक्के वाढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका घेण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. भारत- पाकिस्तान क्रिकेट डिप्लोमसीच्या माध्यमातून उभय देशात चर्चा होणार होती, अशी माहिती प्रसारमाध्यमांतून मिळत होती. मात्र, असे कोणतेही धोरण नसल्याचे त्या म्हणाल्या.
दरम्यान, इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना मोदी हे नेहमी ‘माझे मित्र’ असे संबोधतात, त्यामुळे मोदी इस्त्राईलला भेट देणार हे निश्चित ठरलेले आहे.
यापूर्वी नरसिंह राव यांच्या कार्यकाळात १९९१ मध्ये इस्त्राईलशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मोशे दयान यांची भारत भेट ही त्यावेळी विशेष ठरली. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ज्योती बसु यांनी इस्त्राईलला भेट दिली होती. तर वाजपेयी सरकारच्या काळात जसवंत सिंह आणि लालकृष्ण अडवाणी यांनीही इस्त्राईलला भेट दिली होती.
तर एरियल शरॉन या इस्त्राईलच्या पंतप्रधानांनी २००३ मध्ये पहिल्यांदा भारताला भेट दिली होती. इस्त्राईलचे माजी अध्यक्ष शिमॉन पेरेस यांनी भारतात भेट दिली. मात्र त्यालाही एक दशक उलटून गेले आहे. मात्र माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांच्या जेरुसलेम भेटीनंतरच ख-या अर्थाने दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ झाले आहेत.