उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लादणा-या केंद्रातील भाजपा सरकारविरोधात संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेससह विरोधी पक्षाचे सदस्य एकवटले.
नवी दिल्ली- उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लादणा-या केंद्रातील भाजपा सरकारविरोधात सोमवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत काँग्रेससह विरोधी पक्षाचे सदस्य एकवटले.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी, हा लोकशाहीचा अवमान असल्याचा आरोप केला. तर दुसरीकडे ‘मोदी की तानाशाही नही चलेगी’ अशा जोरदार घोषणाबाजीने काँग्रेसह विरोधकांनी संसदेत हंगामा केला. या गदरोळातच दुपारी दोनपर्यंत व नंतर दिवसभरासाठी राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसच्या २० सदस्यांनी वेलमध्ये येऊन उत्तराखंड प्रकरणी भाजपा सरकारविरोधी घोषणा दिल्या. संयुक्त जनता दल व ‘आप’चे सदस्यही यात सहभागी झाले होते.
सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसचा रुद्रावतार पाहून भाजपाच्या तंबूत पळापळ उडाली.
पैशाच्या बळावर भाजपाचे सरकार आमदार खरेदी करत असून त्यांच्यावर दबावही टाकला जात आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचा आरोप यावेळी खरगे यांनी केला. उत्तराखंड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने २७ एप्रिलपर्यंत स्थगिती आदेश दिल्याने त्यावर अधिक भाष्य करू नये, असे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी खरगे यांना बजावले.