उल्हासनगरवासीयांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर पडण्यासाठी सोयीस्कर व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या दोन्ही स्कायवॉकचा उपयोग नागरिक करत नसल्याने हे स्कायवॉक नक्की कोणासाठी? हा प्रश्न आहे. मात्र…
उल्हासनगरवासीयांना रेल्वे स्थानक परिसरातून बाहेर पडण्यासाठी सोयीस्कर व्हावे, यासाठी उभारण्यात आलेल्या दोन्ही स्कायवॉकचा उपयोग नागरिक करत नसल्याने हे स्कायवॉक नक्की कोणासाठी? हा प्रश्न आहे. मात्र त्याच वेळी या स्कायवॉकचा उपयोग उभरते कलाकार नृत्याच्या सरावासाठी तर प्रेमीयुगुलांना आसरा देणारा ठरत असतानाच नागरिकांना मारहाण करून त्यांना लुटणा-या गांजाडयांच्या टोळक्यांनी स्कायवॉकचा ताबा घेतला आहे. भिका-यांसाठी हे स्कायवॉक रात्र निवारे ठरत आहेत.
एमएमआरडीए या संस्थेने ६०७ कोटी रुपये खर्चून मुंबई व उपनगरांतील रेल्वे स्थानकांच्या पुलांना जोडणारे ३६ स्कायवॉक बनवण्याचे काम २००८ साली हाती घेतल़े यापैकीच उल्हासनगर रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिम बाजूस असलेले दोन स्कायवॉक आहेत़ या दोन्ही स्कायवॉकची एकूण लांबी १५३५ मीटर आहे. यासाठी एमएमआरडीएने ३४.८६ कोटी रुपये खर्च केले. हा स्कायवॉक चांदीबाई महाविद्यालय, उड्डाणपूल, पिंटो पार्क या ठिकाणी उतरत असतानाही जुन्या पायपिटीपेक्षा स्कायवॉकचा मार्ग जास्त लांबीचा असल्याने स्कायवॉकच्या मार्गिकेचा वापर फार कमी प्रमाणात नागरिक करतात़ या स्कायवॉकचा फायदा उचलणारे अत्यल्प असल्याने स्कायवॉकचा ताबा दिवसभर प्रेमीयुगुलांकडे असतो़ या प्रेमीयुगुलांना उभे राहू देण्याकरता स्थानिक गुंड तासाचे १० रुपये प्रमाणे वसुलीही करतात, असे समजत़े या वसुलीत स्कायवॉकचे सुरक्षारक्षकही मागे नसून हेतुपुरस्सर स्कायवॉकच्या एका दुर्लक्षित भागाचे दिवे रात्रीच्या वेळी बंद ठेवून प्रेमीयुगुलांचे आंबट शौक पूर्ण केले जातात. या स्कायवॉकवर गांजाडय़ा टोळक्यांनी बेदम मारहाण करून वाहतूक शाखेचे पोलिस हवालदार म्हस्के यांना लुटल्याची घटना घडली होती. अशा लुटमारीच्या अनेक घटना घडल्या आहेत.
उल्हासनगर पूर्वेचा स्कायवॉक हा प्लॅटफॉर्म २ वरून तीस-चाळीस पायऱ्यांचा चढता प्रवास करणे, दिवसभर थकून-भागून आलेल्या चाकरमान्यांना नकोसे वाटत असल्याने दिवसभर स्कायवॉक भकास दिसतो़ सायंकाळी स्कायवॉकवर लहान मुले रॉक डान्सचा सराव करण्यासाठी तर गर्मीने कंटाळलेले नागरिक थंड हवेचा आस्वाद घेण्यासाठी जेवणानंतर शतपावली करताना दिसतात़ मात्र लुटमारीच्या भीतीमुळे या स्कायवॉकवरून पुरुष मंडळीही जात नाहीत.
लुटमार करण्यासाठी गांजाडय़ांना नागरिक मिळत नसल्याने त्यांनी आता स्कायवॉकच्या साहित्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा महिन्यांपासून स्कायवॉकच्या फायबर शिट, स्टिल रेलिंग आणि स्टिलच्या शिट लंपास केल्या आहेत. स्कायवॉक हस्तांतरणावरून असलेला एमएमआरडीए आणि उल्हासनगर महापालिकेतला वाद तसेच पोलिसांचे असलेले दुर्लक्ष यामुळे स्कायवॉक उभारण्यासाठी सरकारने खर्ची घातलेले कोटय़वधी रुपये वाया गेल्यातच जमा झाले आहेत.